“हे चौकीदारांचे गाव आहे, चोरांना येण्यास मनाई आहे” ; ‘या’ गावात पोस्टरबाजी

वाराणसी : वृत्तसंस्था – निवडणुकीत विविध पक्ष आपला प्रचार करण्यासाठी विविध फंडे वापरत असतात. विविध पोस्टर लावून ते आपला प्रचार करत असतात. या सगळ्या निवडणुकांच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या वाराणसीतील ककरहिया गावातील एक पोस्टर्स चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरले आहे. या पोस्टरवर लिहिलेला संदेश सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘हे चौकीदारांचे गाव आहे, चोरांना येण्यास मनाई आहे’ असा मजकूर त्या पोस्टर्सवर आहे.

गावकऱ्यांनीच हे पोस्टर गावात लावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे गाव दत्तक घेतल्यानंतर या गावाचा विकास झाला म्हणून त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हे पोस्टर लावल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

या निवडणुकीत काँग्रेसने नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी ‘चौकीदार चोर है’ असा नारा दिला. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने ‘मैं भी चौकीदार’ हि मोहीम हाती घेतली. सांसद आदर्श ग्राम योजनेतंर्गत पंतप्रधान मोदी यांनी ककरहिया गाव २३ ऑक्टोबर २०१७ मध्ये दत्तक घेतले होते. पंतप्रधानांनी हे गाव दत्तक घेतल्यावर गावाचा विकास झाला. पंतप्रधान मोदी यांनी खासदार निधीतून गावात रस्ते बांधले. गावात वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाले. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर गावचा विकास केल्यामुळे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हे पोस्टर गावकऱ्यांनी लावले आहे.

विशेष म्हणजे हे पोस्टर कोणत्याही राजकीय पक्षाने लावले नसून गावकऱ्यांनी लावल्याने चर्चेचा विषय ठरले आहे. या गावात सातव्या टप्प्यात १९ मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार असून काल मंगळवारी गावात हे पोस्टर लावण्यात आले आहे.