Pune : महापालिकेच्या 300 कोटींच्या आरोग्य व्यवस्थेचे होणार ‘पोस्टमार्टेम’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा कमकुवतपणा समोर आला. परिणामी, पालिकेने आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता, प्रचलित व्यवस्थेमध्ये बदल केले जाणार आहेत. आरोग्य विभागासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद वर्षाअखेरीस केली जाते. यावर अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले, की “एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करुनही त्रुटी मात्र कायम आहेत. त्यामुळे निधीचा विनियोग, निविदांचा खर्च, ठेकेदार, सेवांचा दर्जा आदींची तपासणी केली जाणार आहे. नेमका निधी कुठे जातो, कशावर किती वापरला जातो, खरेदी प्रक्रिया साहित्याचा दर्जा यावर बारीक नजर ठेवली जाणार आहे.”

पालिकेने नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांना रुग्णालयात चांगली सेवा मिळत नाही. सध्या महापालिकेच्या हद्दीतील लोकसंख्या 35 ते 40 लाखांच्या घरात आहे. लोकसंख्येचा परिणाम उपचार आणि योजनांवरही होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उपचार आणि योजनांपासून वंचित राहावं लागतं. अनेकदा सामाजिक क्षेत्रातून तसेच राजकीय क्षेत्रामधून शहरी गरीब योजना, अंशदायी योजनांच्या अंमलबजावणीवरुन पालिकेला टीकेला सामोरं जावं लागतं.

येत्या काळात सर्व व्यवस्थेचाच आढावा घेऊन आवश्यक बदल केले जाणार आहेत. शहरातील विविध प्रभागांमधील आरोग्य व्यवस्थेत समतोल नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे काही ठराविक भागात विविध प्रकारचे दवाखाने आहेत. तर, काही भागात दवाखानेच नाहीत. आगामी काळात हा समतोल राखण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी नियोजन करुन कोणत्या भागात कोणत्या आरोग्य व्यवस्थेची आवश्यकता आहे याचा अभ्यास करुन त्यानुसार ‘प्लॅनिंग’ केले जाणार आहे. कोरोना काळात पालिकेची आरोग्य व्यवस्था उभी करताना झालेली दमछाक, खाटा-ऑक्सिजन-आयसीयू खाटा उपलब्ध करताना करावी लागलेली कसरत सर्वांना माहित आहे. या सर्व अनुभवामधून पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.