Coronavirus : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना अद्याप मुहूर्त मिळेना; निवडणुका सहाव्यांदा लांबणीवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर या निवडणुका घेतल्या जाणार होत्या. पण आता राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानुसार, या निवडणुकांना 31 ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलाव्या लागत आहेत. यापूर्वी राज्य सरकारने गेल्यावर्षी 18 मार्च, 17 जून आणि 28 सप्टेंबर रोजी आदेश काढून या निवडणुका 31 डिसेंबर 2020 पर्यंत स्थगित केल्या होत्या. तर यावर्षी 2021 मध्ये 16 जानेवारी आणि 24 फेब्रुवारीला आदेश काढून या निवडणुका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता 31 ऑगस्टपर्यंत या संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचे आदेश राज्याच्या सहकार विभागाचे कार्यसन अधिकारी अनिल चौधरी यांनी काढले आहेत.

45 हजारांपेक्षा अधिक सहकारी संस्था

राज्यातील प्रलंबित असलेल्या सुमारे 45,276 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. त्यानुसार, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने या संस्थांच्या निवडणुकांचे जिल्हा निवडणूक आराखडे तयार केले आहेत. मात्र, आता या निवडणुकांना पुन्हा स्थगिती मिळाली आहे. राज्य सरकारने आतापर्यंत सहाव्यांदा या संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.