छिंदमचा निर्णय होईपर्यंत महापौर पदाची निवडणूक स्थगित करा 

अहमदनगर :पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द करावे, त्याच्यावर जिल्हाबंदीची कारवाई करुन त्याच्या संपत्तीची चौकशी व्हावी, तसेच ईव्हीएम मशीनची पूजा करण्यासाठी त्याचा भाऊ श्रीकांत छिंदमला साथ देणाऱ्या इतरांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत महापौरपदाची निवडणुक घेऊ नये, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच छिंदमला स्विकारणाऱ्या राजकीय पक्षावर भविष्यात बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना श्रीपाद छिंदम याने दुखावल्या होत्या. या कृत्याबद्दल त्याचे महापालिकेच्या महासभेत नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव मांडला होता. हा ठराव राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला होता. यावर सुनावणी होऊन ३ महिने उलटले असतानाही यावर अद्याप निर्णय देण्यात आलेला नाही. यामुळेच नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र.९ क मधून श्रीपाद छिंदम अपक्ष निवडून आला. या प्रकरणात भाजपच्या लोकप्रतिनिधींनी सकारात्मक निर्णय घेतला नसल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी श्रीपादचा भाऊ श्रीकांत छिंदमसह काहींनी पुरोहितासह ईव्हीएम मशीनची अनधिकृतपणे पुजा केली. या प्रकरणात श्रीकांत छिंदमवर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली. मात्र इतरांवर कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार माधुरी आंधळे यांना देण्यात आले. तर या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री व नगरविकास राज्यमंत्री यांना पाठविण्यात आली आहे.

यावेळी रेखा जरे पाटील, गोरख दळवी, मनोज कोंडके, सोमनाथ रोकडे, सुरेखा सांगळे, प्रशांत गायकवाड, अमोल कवडे, निलेश पोटे, सोमनाथ वाघचौरे, सुरेखा सांगळे, मनिषा गायकवाड, अशोक चव्हाण, अशोक कुटे, गजेंद्र दांगट, शुभम लांडगे, राहुल गायकवाड, विशाल होन, विशाल दळवी आदिंसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.