गृहिणींचे बजेट कोलमडले, बटाटा तब्बल 55 रुपयांवर

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सर्वसामान्य नागरिकांच्या दररोजच्या भाजीतील बटाट्याने 55 रुपये किलोवर उसळी घेतली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. अगोदरच कोरोनामुळे किराणा दरवाढीने घरखर्चाचे गणित बिघडलेल्या ग्राहकांना आता बटाटा दरवाढीने हैराण केले आहे. गेल्या महिन्याभरापासून बटाट्याच्या दरात सतत वाढ होत आहे.

आवक घटल्यामुळे मुंबई, ठाणे आणि पुणे येथील किरकोळ बाजारात बटाट्याचे दर 25 ते 30 रुपये किलोवरून थेट 50 ते 55 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. उत्तरेकडील राज्यांतून बटाट्याची आवक कमी होत असल्याने आणखी चार महिने बटाटा तेजीत राहील, अशी माहिती व्यापार्‍यांनी दिली. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारात उत्तम प्रतीच्या बटाट्याचा दर 25 ते 30 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात बटाटा 50 ते 55 रुपये किलोने विकला जात आहे.

सध्या उत्तरेकडील राज्यातून बटाट्याची आवक घटल्यामुळे घाऊक बाजारात बटाट्याचा तुटवडा असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. मागणीच्या तुलनेत बटाट्याची आवक कमी होत असल्याने भाववाढ झाली आहे. दिली. दरम्यान, आठवड्याभरापासून पुणे, मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश हॉटेल, उपाहारगृहे आणि खानावळी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारांत बटाट्याची मागणी वाढली आहे. बटाट्याची आवक अशीच रोडावलेली राहिल्यास येत्या काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.