Solapur News : …अन् सिध्दरामेश्वरांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा झाला विवाह

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महायात्रेत पारंपरिक अक्षता सोहळा पार पडला. आज नंदीध्वज संमती कट्ट्यावर आणले गेले नाहीत. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सिद्धेश्वर यात्रा पंच कमिटीचे सदस्य आणि मानकरी उपस्थित होते.

सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा साध्या पद्धतीने पार पडला. तेव्हा ना हलग्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला, ना नंदीध्वजाची मिरवणूक दिसली. तथापि, यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक निर्बध लागू केल्याने पारंपरिकता दृष्टीस न पडल्यामुळे भक्त भावनिक झाले खरे; पण आपल्या घरापासून मार्गस्थ होताना भाविकांनी ‘हर्र बोला हर्र..सिद्धेश्वर महाराज की जय..!’ असा जयघोष केला. बग्गीतून योगदंड अन रथासारखे सजवलेल्या वाहनातून पालखी नेताना प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांनी अक्षता सोहळ्याला उपस्थिती लावली होती.