वीज बिलाचा ‘शॉक’ बसलेल्या ग्राहकांना ऊर्जा मंत्र्यांचा दिलासा, केली मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळी, तर काही ठिकाणी कामगारांच्या पगारामध्ये कपात करण्यात आली,. कोरोनाच्या संकटादरम्यान राज्यातील नागरिकांनी महागाईचा सामना करावा लागत असतानाच वीज कंपनीने मोठ्या रकमेचं वीज बिल पाठवून ग्राहकांना एक प्रकारे शॉक दिला. यावर सत्ताधारी नेत्यांनी आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत वीज ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी केली. या संदर्भात आज (मंगळवारी) राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ग्राहकांना मोठा दिलास देत मोठी घोषणा केली आहे.

राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले की, ग्राहकांना 3 महिन्यांचं बिलं हप्ता पद्धतीने भरता येणार आहे. या हप्त्यांवर कोणतंही व्याज नसेल. तसेच समितीचा अहवाल आल्यानंतर 100 युनिट वीज मोफत देण्याबद्दल विचार केला जाईल, असे नितीन राऊत यांनी म्हटले आहे.
नितीन राऊत म्हणाले, गेल्या काही दिवसांत वीज बिलांचे आकडे ऐकून ग्राहकांना धक्का बसला आहे. ग्राहक वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये लोक गर्दी करत असल्याचंही दिसत आहे. पण वीज कंपनीनं कोणालाही वाढीव वीज बिल पाठवलेलं नाही. लॉकडाऊनमध्ये घरातील सगळ्याच व्यक्ती घरी होते. त्यामुळे दिवसभर पंखा किंवा इतर स्वरुपात वीजेचा मोठा वापर होता. या काळात वीज बिलं न मिळाल्यामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे सुमारे 600 कोटी रुपये कर्ज घ्यावे लागलं आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना फसवलं नसल्याचं नितन राऊत यांनी सांगितलं.

लॉकडाऊनमध्ये वीज रीडिंग घेता येत नव्हते त्यामुळे कोणालाही वीज बिलं दिलेली नाहीत. वीज बिलं दिलं असेल तरी कोणाचीही वीज तोडलेली नाही. ग्राहकांनी एसएमएसद्वारे रीडिंग पाठवा अशी आम्ही सूचना ग्राहकांना केली होती. मात्र अगदी 2 ते 3 टक्के ग्राहकांनीच मीटर रीडिंग पाठवली होती. त्यामुळे 31 मे 2020 पर्यंतची बिलं आम्ही ढोबळमानाने पाठवली असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली.