PPF चा नियम बदलला ! ‘या’ नियमात मिळाली मोठी सूट, अकाऊंट चालू ठेवण्यासाठी करावं लागणार ‘हे’ काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनच्या निर्बंधांदरम्यान सरकारने भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) च्या गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या पीपीएफ खातेदारांना त्यांचे खाते वाढवायचे आहे, त्यांना सरकार सवलत देत आहे. पीपीएफ खाते परिपक्व झाल्यानंतर अकाउंट एक्सटेंशन फॉर्म जमा करण्यासाठी एक वर्षाचा अतिरिक्त कालावधी दिला जातो. बर्‍याच गुंतवणूकदारांना हा फॉर्म मार्चमध्ये जमा करायचा होता, पण लॉकडाऊनमुळे तो करता आला नाही.

मात्र आता गुंतवणूकदार नोंदणीकृत ईमेल आयडीद्वारे देखील आपला एक्सटेंशन फॉर्म जमा करू शकतात. म्हणजेच गुंतवणूकदार आता फॉर्म ऑनलाईन जमा करतील आणि लॉकडाऊन संपल्यानंतर ते पीपीएफ एक्सटेंशनची मूळ प्रत जमा करतील. पीपीएफ खाते १५ वर्षात परिपक्व होते. यानंतर ते ५-५ वर्षे वाढवता येऊ शकते. पीएफ खाते कोणत्याही योगदानाशिवाय चालू ठेवता येते. जोपर्यंत खाते बंद होत नाही, तो पर्यंत त्यात जमा केलेल्या रकमेवर व्याज देखील मिळत राहील.

खाते चालू ठेवण्यासाठी काय करायचे ?
पीपीएफ खाते सुरू ठेवण्यासाठी खातेधारकांना खाते परिपक्वतेच्या एका वर्षात फॉर्म एच जमा करावा लागतो. जर हे केले नाही तर पीपीएफ खाते परिपक्व झाल्यानंतर त्यामध्ये जमा झालेल्या रकमेवर कोणतेही व्याज मिळत नाही. पीपीएफचा आणखी एक फायदा असा आहे की, पीपीएफ खाते सहजपणे पोस्ट ऑफिस आणि बँका दोन्हीमध्ये उघडता येते आणि पीपीएफ सुविधा पुरवणार्‍या बर्‍याच बँकांमध्येही ऑनलाईन देखील उघडता येते. अर्ज सत्यापित करण्यासाठी आणि मुद्रित करण्यासाठी आपल्याला फक्त एका बँक शाखेत जाणे आवश्यक असते.