Coronavirus : सरकारकडून PPF – ‘सुकन्या समृध्दि’ खातेदारांसाठी मोठी ‘सवलत’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोक घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे काही लोकांना रोख रकमेची कमतरता भासू लागली आहे. दरम्यान, पीपीएफ आणि सुकन्या समृद्धि योजनेच्या गुंतवणूकदारांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), आवर्ती ठेव (आरडी) आणि सुकन्या समृध्दी योजनेतील खातेदारांसाठी किमान ठेव जमा करण्याची अंतिम मुदत सरकारने तीन महिन्यांसाठी वाढविली आहे.

31 मार्च होती अंतिम तारीख
वित्त मंत्रालयाने गुंतवणूकदारांना दिलासा देत पीपीएफ, आरडी आणि सुकन्या समृध्दी खात्यात 2019-20 ची किमान रक्कम 30 जून पर्यंत जमा करण्याची सवलत दिली आहे. पहिल्यांदा यांची शेवटची तारीख 31 मार्च होती. वित्त मंत्रालयाने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर केले गेले आहे आणि यामुळे पीपीएफ, आरडी आणि सुकन्या समृद्धी खातेधारकांच्या छोट्या बचत ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नियमात सूट दिली आहे.

या योजनांमध्ये किमान रक्कम जमा करणे बंधनकारक
या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूकीसाठी किमान रक्कम निश्चित करण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहक त्यांच्या खात्यात रक्कम जमा करून ती चालू ठेवू शकतात. दरम्यान, बर्‍याचदा ग्राहक वित्तीय योजनेच्या शेवटी या योजनांमध्ये निधी जमा करतात कारण त्यांना आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत सूट देण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) आणि सुकन्या समृध्दी योजना या छोट्या बचत योजनांवरील व्याज दरात कपात केल्याची माहिती मिळाली आहे. सरकारने छोट्या बचत योजनेचा व्याज दर 0.70 टक्क्यांवरून 1.40 टक्के केला आहे. हा कमी केलेला व्याज दर एप्रिल-जून 2020 तिमाहीत लागू होईल.