Post Office नं जाहीर केली ग्राहकांसाठी नवीन सुविधा ; PPF, SSY च्या गुंतवणूकदारांना होणार ‘भरघोस’ फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय पोस्ट विभागाने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृध्दी योजना खाती,  आरडी आणि इतर पोस्ट ऑफिस योजनांमध्ये ठेवी, पैसे काढणे आणि खाते बंद करण्यासाठी सामान्य फॉर्म वापरण्यास परवानगी दिली आहे. 15 एप्रिलच्या भारतीय पोस्ट परिपत्रकात असे म्हटले आहे की, सामान्य फॉर्म पीपीएफ, सुकन्या समृद्धि आणि इतर पोस्ट ऑफिस योजनांसाठी वापरला जाऊ शकतो. पोस्ट विभागाने असे म्हटले आहे की, वेगवेगळ्या बचत योजनांसाठी विविध फॉर्म वापरण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल विविध क्षेत्रातील युनिट्स आणि इतर भागधारकांकडून त्यांना माहिती मिळाली होती. तसेच, हे फॉर्म मुद्रित करण्यात आणि पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्धता सुनिश्चित करण्यात समस्या येत होती. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

भारतीय पोस्ट विभागाने म्हटले आहे की, ही पूर्णपणे परिचालन संबंधित समस्या आहे, त्यामुळे सर्व पोस्ट ऑफिससाठी या सामान्य प्रकारांचा वापर करण्यास परवानगी देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.

1. खाते उघडण्यासाठी व खरेदीचे प्रमाणपत्र संबंधित अर्ज
2. पे-इन स्लीप
3. खाते परिपक्व झाल्यावर खाते बंद करण्यासाठी अर्ज
4. खात्याचा पूर्व-परिपक्व बंद करण्याचा फॉर्म
5. आरडी / पीपीएफ आणि एसएसए खात्यांमधून कर्ज / पैसे काढण्यासाठी अर्ज
6. आरडी / टीडी / पीपीएफ / एससीएसएस खात्यांची मुदत वाढविण्यासाठी अर्ज

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या सद्यस्थितीत सरकारने पीपीएफ, सुकन्या समृध्दीसह बचत योजनांसाठी नियमांमध्ये थोडी सूट दिली आहे. याअंतर्गत, ज्या गुंतवणूकदारांना आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये किमान ठेव जमा करता आले नाही त्यांना 30 जून, 2020 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच, आवश्यक असलेली किमान रक्कम 30 जूनपर्यंत पीपीएफ, सुकन्या आणि पोस्ट ऑफिस आरडीमध्ये जमा केल्यास गुंतवणूकदारांना कोणताही दंड आकारला जाणार नाही.