अहमदनगर : प्रदीप टाक खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भिंगार परिसरातील प्रदीप टाक यांच्या खूनप्रकरणी दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सिध्दार्थ धर्माजी उबाळे (वय – ३७), सुमोत धर्माजी उबाळे (वय -४३ वर्षे,

दोघे रा.पंचशिलनगर, भिंगार, ता.जि. अहमदनगर) ही शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, प्रदिप रामसिंग टाक याचा खून केल्याप्रकरणी मा. तदर्थ जिल्हा न्यायाधीश क. १, श्रीमती आर.पी.परदेशी यांनी वरील दोन्ही आरोपीस भा.दं.वि.का.क. ३०२ नुसार दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी २०,०००/- रू. दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.

सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, दि. ३०/०४/२०१३ रोजी रात्री १०:३० चे सुमारास दुपारी झालेल्या किरकोळ भांडणावरून फिर्यादी दिपक रामसिंग टाक हा त्याचे नेहरू कॉलनी भिंगार येथील घरासमोर उभा असताना दोन्ही आरोपींनी त्यास सुरूवातीस शिवीगाळ केली. त्यावरून फिर्यादी दिपक याने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता , दोन्ही आरोपींनी त्यास लाथा-बुक्क्यांनी मारण्यास सुरूवात केली. सदर भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीचा भाउ प्रदिप हा भांडण सोडविण्यासाठी आला असता वरील दोन्ही आरोपींनी प्रदिप यास त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने डोक्यावर व शरिरावर इतर ठिकाणी जबर मारहाण केली. सदर मारहाणीमध्ये प्रदिप यांच्या डोक्यास गंभीर जखम होवुन ते बेशुध्द पडले. त्यानंतर प्रदिप यास सुरूवातीला जिल्हा रूग्णालय अहमदनगर , त्यानंतर सिटीकेअर हॉस्पीटल अहमदनगर व त्यानंतर रूबी हॉल क्लिनीक पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार चालू असताना प्रदिप हा सदर गंभीर दुखापतीमुळे दि. ०४/०५/२०१३ रोजी पुणे येथे मयत झाला.

सदर घटनेची फिर्याद मयताचा भाउ दिपक याने दि. ०१/०५/२०१३ रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला दिल्यानंतर आरोपींविरूध्द सुरूवातीस भा.दं.वि.का.कलम ३०७, ३३७, ४२७, ३२३ व ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रदिप मयत झाल्यानंतर आरोपींविरूध्द भा.द.वि.का.कलम ३०२ हे वाढीव कलम लावण्यात आले. सदर गुन्हयाचा तपास करून भिंगार कॅम्प पोलीसांनी आरोपींविरूध्द मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याचे सुरूवातीचे काही कामकाज तदर्थ जिल्हा न्यायाधीश श्री.ए.एन.चौरे साहेब यांचेसमोर चालले व नंतर तदर्थ जिल्हा न्यायाधीश क्र. १ श्रीमती आर.पी.परदेशी यांचेसमोर चालले. फिर्यादीतर्फे एकुण ०९ साक्षीदार तपासण्यात आले. सदर साक्षीदारांपैकी सरकारी पक्षातर्फे ०३ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तसेच आरोपीने गुन्हयात वापरलेले हत्यार काढुन दिलेल्या पुराव्याबाबत ०१ साक्षीदार, तसेच मयत प्रदिपवर उपचार करणारे डॉ. संजय व्होरा तसेच शवविच्छेदन करणारे डॉ. विजय जाधव, ससून हॉस्पीटल पुणे, तसेच सदर खटल्याचे तपासी अधिकारी पो.उप.निरी.तुकाराम चौधरी, पो.निरी. विजय देशमुख व सहा.पो.निरी.राहुलकुमार पाटील यांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी पक्षाने सादर केलेला भक्कम पुरावा, युक्तिवाद व सरकार पक्षातर्फे अॅड.अनिल दि.सरोदे यांनी मा.न्यायालयात सादर करण्यात आलेले उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निकालाचे दाखले ग्राहय धरून मा.न्यायालयाने वरीलप्रमाणे आरोपींना शिक्षा ठोठावली.

सदरचा सत्र खटला मा. तदर्थ जिल्हा न्यायाधीश क्र.१ श्रीमती.आर.पी.परदेशी मॅडम यांचेसमोर चालला. सरकारी पक्षाच्या वतीने अति. सरकारी अभियोक्ता श्री. अनिल सरोदे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पो.हे.कॉ.आण्णासाहेब सोनवणे यांनी गुन्हयाचे कामकाजादरम्यान सहाय्य केले मा. न्यायालयात आलेला पुरावा तसेच अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अनिल सरोदे यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन मा. न्यायालयाने दोघांना दोषी ठरविले.