‘मी देवाला नाही मोदींना पाहिलं’, महिलेकडून हे ऐकून भावुक झाले पंतप्रधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जन औषधी दिवशी एका महिलेशी बोलताना पंतप्रधान मोदी भावनिक झाले. पंतप्रधानांशी बोलताना एक महिला म्हणाली की मी देवाला नाही, पण पंतप्रधान मोदींना पाहिले. असे म्हणत ही महिला पंतप्रधान मोदींसमोर रडू लागली. महिलेशी बोलताना पंतप्रधान देखील भावनिक झाले होते.

या कार्यक्रमाच्या वेळी एक महिला दिपा शाह म्हणाली की, तिला अर्धांगवायू झाला आहे. पहिल्यांदा औषध खरेदीसाठी तिचे 5,000 रुपये खर्च होत होते, परंतु जेव्हापासून तिने जनऔषधी मधून औषधे खरेदी करण्यास सुरुवात केली तेव्हा पासून तिचा खर्च 1,500 रुपये झाला. त्या म्हणाल्या की, त्या बाकी शिल्लक राहिलेल्या पैशांमधून घर चालवतात आणि फळं खरेदी करतात.

देशभरात सुरु झाले 6 हजार जन औषधी केंद्र –
या कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, जन औषधी दिवस फक्त एक योजनेनिमित्त साजरा करण्याचा दिवस नाही तर त्या कोट्यावधी भारतीय आणि लाखो कुटूंबाना जोडण्याचा दिवस आहे ज्यांना या योजनेमुळे दिलासा मिळाला. पंतप्रधान म्हणाले की, देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत स्वस्त आणि उत्तम इलाज पोहोचवण्याचा संकल्प आहे. त्यांनी सांगितले की आतापर्यंत 6 हजारपेक्षा जास्त जन औषधी केंद्र देशभरात सुरु झाली आहेत.

दिपा शाह यांनी सांगितली परिस्थिती –
पंतप्रधान मोदींसोबत कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलताना दिपा शाह म्हणाल्या, पंतप्रधान मोदी मला 2011 साली अर्धांगवायू झाला. मी बोलू शकत नव्हते, माझ्यावर उपचार सुरु होते. औषधे अत्यंत महाग होती. त्यामुळे घर चालवणे अवघड झालं होतं. तुमच्या माध्यमातून जन औषधीतून औषधे मिळाली. माझी औषधे 5,000 रुपयांची होती. आता ती 1,500 रुपयात येतात. जे काही पैसे शिल्लक राहतात त्यातून मला इतर कारणांसाठी खर्च करता येतात. मोदीजी मी तर देवाला पाहिलेले नाही, परंतु मी तुम्हाला देवाच्या रुपात पाहिले. तुमचे खूप खूप आभार.