RTI Info : प्रधानमंत्री जन-धन योजनेतील खातेदारांमध्ये 55% महिला

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत (पीएमजेडीवाय) निम्म्याहून अधिक खातेदार अर्थात सुमारे 55 टक्के महिला आहेत. माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) मागविलेल्या माहितीतून हा डेटा समोर आला आहे. परंतु, महिला व पुरुषांच्या खात्यात जमा पैशांची आकडेवारी देण्यात आलेली नाही.

मध्य प्रदेशचे माहिती प्राधिकरण कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांना सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरात म्हटले की, 9 सप्टेंबर 2020 पर्यंत पीएमजेडीवाय अंतर्गत एकूण 40.63 कोटी खाती होती. त्यापैकी 22.44 कोटी खाते महिलांचे तर 18.19 कोटी खाती पुरुषांची होती. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरच्या सुरूवातीस या पीएमजेडीवाय खात्यात ठेव 8.5 टक्क्यांनी वाढून सुमारे 1.30 लाख कोटींवर पोहोचली आहे.

सूचनेत म्हटले आहे की, 1 एप्रिल 2020 पर्यंत पीएमजेडीवाय खात्यात एकूण ठेवी 1,19,680.86 कोटी रुपये होती, जी 9 सप्टेंबर 2020 पर्यंत 8.5 टक्क्यांनी वाढून 1,29,811.06 कोटी रुपये झाली. दरम्यान, अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, महिला व पुरुष खातेदारांच्या खात्यात ठेवींचा स्वतंत्र तपशील ठेवला गेला नाही.

पीएमजेडीवाय खात्यांमधील शून्य शिल्लक किंवा शिल्लक संबंधित प्रश्नावर अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, 9 सप्टेंबर 2020 पर्यंत 3.01 कोटी खाती होती ज्यात पैसे नव्हते. 7 ऑक्टोबर 2020 रोजी पीजेडीवायच्या आकडेवारीनुसार खातेदारांची एकूण संख्या 40.98 कोटी आहे. या खात्यांमधील ठेवी 1,30,360.53 कोटी रुपये आहेत. पंतप्रधान जन धन योजना राष्ट्रीय आर्थिक समावेशन अभियानांतर्गत ऑगस्ट 2014 मध्ये सुरू करण्यात आली.