प्रधानमंत्री किसान स्कीम : 6000 रुपयांची मदत हवी असेल तर 5 महिन्यात करावे लागेल ‘हे’ काम !

नवी दिल्ली : जर तुम्हाला पीएम किसान स्कीम अंतर्गत वार्षिक 6000 रूपयांचा लाभ घ्यायचा असेल तर आधार व्हेरिफिकेशनसाठी तयार राहा. देशातील काही राज्यात या स्कीमचे पेसे घेण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत कोणत्याही स्थितीत आधार लिंक करावे लागेल. हे काम पाच महिन्यांच्या आत करावे लागेल. अन्यथा पैसे मिळणे बंद होईल. यानंतर सरकार कोणतीही संधी देणार नाही. अशा राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालयचा सहभाग आहे. अन्य राज्यांमध्ये एक डिसेंबर 2019 पासूनच आधार अनिवार्य केले आहे. आधारशिवाय आता कुणाला स्कीमचे पैसे मिळणार नाहीत.

स्कीमचा लाभ घेण्यासाठी सरकार सुरूवातीला आधार कार्ड मागत होते. परंतु नंतर जास्त दबाव नव्हता. मात्र आता हे अनिवार्य केले आहे, जेणेकरून खर्‍या शेतकर्‍यांना योजनेचा लाभ मिळावा. लाभाची रक्कम केवळ पीएम-किसान पोर्टलवर राज्य/केंद्र शासित प्रदेश सरकारद्वारे अपलोड केलेल्या लाभार्थींच्या आधार सीडेड डेटाद्वारेच जारी केली जाते.

असे होते आधार सीडिंग
जे बँक खाते योजनेसाठी दिले आहे, त्या बँकेत जावे लागेल. तेथे आधार कार्डची फोटो कॉपी द्या. आधारशी खाते लिंक करायचे असल्याचे सांगा. फोटो कॉपीवर खाली एक सही करा.

ऑनलाइन सुद्धा आधार सीडिंग करता येते. बँकेच्या ऑनलाइन खात्यावर जाऊन 12 अंकी आधार नंबर टाइप करा आणि सबमिट करा. जेव्हा आधार बँक नंबरशी लिंक होईल त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मॅसेज येईल. यासाठी तुमच्याकडे नेट बँकिंग सुविधा हवी.

किती शेतकर्‍यांना मिळाले पैसे
कृषी मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत सुमारे 11.17 कोटी शेतकर्‍यांना सुमारे 95 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या 11,19,474 शेतकरी कुटुंबांना स्कीमचे पैसे मिळाले आहेत. अशाच प्रकारे मेघालय 1,74,105 आणि आसामच्या 31,16,920 शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे.