मालेगाव बॉम्बस्फोट खटला : सुनावणीस मुख्य आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा अनुपस्थित

पोलीसनामा ऑनलाईन – 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यातील प्रमुख आरोपी आणि भाजपच्या भोपाळ येथील खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या शनिवारी (दि. 19) झालेल्या सुनावणीलाही गैरहजर होत्या. न्यायालयाने याबाबत नाराजी व्यक्त करत सगळ्या आरोपींना 4 जानेवारीला हजर राहण्याचे बजावले आहे.

कोरोनामुळे मालेगाव 2008 चा बॉम्बस्फोट खटला प्रकरणाची सुनावणी थांबली होती. मात्र नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने खटल्याच्या नियमित सुनावणीला सुरु करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्यासह सात आरोपींना न्यायालयाने 3 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह काही आरोपी 3 डिसेंबरच्या सुनावणीला गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने सगळ्या आरोपींना शनिवारी (दि.19) उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र शनिवारच्या सुनावणीलाही प्रज्ञासिंह यांच्यासह एक आरोपी अनुपस्थित राहिला.

साध्वी यांच्यावर एप्रिलपासून दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी त्या तपासणीसाठी गेल्या असता त्यांना डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सुनावणीला त्या हजर होऊ शकल्या नाहीत, असे त्यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले.