धक्कादायक ! मुंबईत बलात्काराच्या घटनेत 51 टक्क्यांनी ‘वाढ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रजा फाऊंडेशन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला आणि लहान मुलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार, बलात्कार, महिलांशी छेडछाड, लैंगिक अत्याचार अशा घटनांमध्ये जवळपास 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2014 ते 2019 पर्यंतचा हा अहवाल आहे.

आणखी एक महत्त्वाची बाब अशी की, मुंबईतील काही वर्षांची सरासरी पाहिली तर लहान मुलांवरील अत्याचारांच्या घटनेत 69 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातील 90 टक्के प्रकरणांमध्ये अत्याचार करणारी व्यक्ती ही त्यांच्या परिचयाचीच असल्याचं समजत आहे.

गेल्या 5 वर्षांत महिला आणि बालकांवरील अत्याचाराची एकूण प्रकरणं- 784.
लहान मुलांवरील अत्याचारांची प्रकरणं- 540

यातील 59 टक्के प्रकरणं अशी आहेत ज्यात गुन्ह्याची माहिती पोलिसांना देण्यास नागरिकांनी माघार घेतली आहे. अशा प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी वकिलांची 15 पदे मंजूर केली आहेत. परंतु एकच सरकारी वकिल कार्यरथ असल्याचे समजत आहे. 50 कंत्राटी सरकारी वकिलांची पदे मंजूर असतानाही केवळ 36 कंत्राटी सरकारी वकिलांचा भरणा करण्यात आला आहे.

प्रजा फाऊंडेशननं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात 2017 साली 1,05,404 प्रकरणं दाखल झाली आहेत. यातील 70 टक्के प्रकरणं ही वर्षाअखेर पर्यंत प्रलंबित होती. प्रजाच्या अहवालात असंही म्हटलं आहे की, या प्रकरणांचा तपास करणारी यंत्रणा कमी पडत आहे. समोर आलेल्या या धक्कादायक माहितीनंतर मुंबईतील महिला आणि लहान मुले खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

प्रजानं आपल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2019 पर्यंत या प्रकरणांचा तपास करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षकांची 41 टक्के पदे रिक्त आहेत तर पोलीस निरीक्षकांची 28 टक्के पदे रिक्त आहे अशी माहिती समोर आली आहे.

Visit : Policenama.com