प्राजक्ता गायकवाडला ‘आई माझी काळूबाई’ मालिकेतून बाहरेचा रस्ता ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (prajakta-gaikwad) सध्या छोट्या पडद्यावर आई माझी काळूबाई (aai-mazhi-kalubai)या मालिकेत काम करत होती. मात्र मालिकेतील इतर कलाकार आणि क्रू मेंबर्सने तक्रार केल्यानंतर निर्मात्या अलका कुबल (Alka Kubal) यांनी तिला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता या मालिकेत तिच्या जागी अभिनेत्री वीणा जगतापची वर्णी लागली आहे. वीणाने यापूर्वी राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतून लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर मराठी बिग बॉसमुळेही ती चर्चेत होती.

ईटाइम्सच्या वृत्तानुसार, आई माझी काळूबाई मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी सांगितले की, संपूर्ण टीमने तिला मालिकेतून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कुबल म्हणाल्या अनप्रोफेशनल वर्तणूक सगळीकडे असते. काही ठिकाणी ते चालवून घेतले जाते तर काही ठिकाणी त्यावर कारवाई केली जाते. प्राजक्ताच्या उद्धट वर्तणूकीमुळे इतर कलाकारांवर परिणाम होऊ लागला. संपूर्ण युनिट तिच्या गैरवर्तणूकीचा साक्षीदार आहे. त्यामुळे आम्ही तिला मालिकेतून काढण्याचा निर्णय घेतला.

कुबल म्हणाल्या की, मला आशा आहे की प्राजक्ता इव्हेंट आणि काम याच्यात समतोल साधायला शिकेल. प्राजक्ताला समजायला हवे होते की मालिकेला गेल्या काही दिवसात बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागले. आपले काही कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले. प्राजक्ताचे इव्हेंट्सला जास्त प्राधान्य होते. ती सेटवर यायची नाही. मी पण कलाकार आहे आणि मलादेखील इव्हेंट्सला जावे लागते. पण मी काम आणि इव्हेंट्समध्ये समतोल राखते. प्राजक्ता अचानक कळवते की माझे डोके दुखते आहे आणि मी घरी जाते आहे. नंतर आम्हाला कळते की ही इव्हेंटला गेली होती. हे खूप वाईट आहे.
प्राजक्ताच्या अनप्रोफेशनल वागणूकीमुळे आम्हाला कारवाई करावी लागल्याचे कुबल सांगतात. शरद पोंक्षे सारखे कलाकार ज्यांनी कर्करोगावर मात करून आता शुटींगला सुरुवात केली आहे. प्राजक्ताच्या अनुशासित स्वभावामुळे त्यांना मी बारा तास काम करायला लावू शकत नाही. आम्हाला खूप वाईट अनुभव आला.

एका वृत्तानुसार, प्राजक्ता गायकवाडने सांगितले की, मालिकेचे चित्रीकरण साताऱ्याला असते. संपूर्ण टीम तिथेच राहते. त्यामुळे सेटवर उशिरा येण्याची तक्रार कुणाच्याही बाबतीत होऊ शकत नाही. तसेच मालिका स्वीकारतानाच मी माझ्या परीक्षेबाबत सांगितले होते. पण, आपण चित्रीकरण करतोय. तुला परीक्षेसाठी जाता येणार नाही,असे मला सांगण्यात आले. मी परीक्षा देऊ शकले नाही. या सगळ्या वातावरणात काम करणे शक्य नसल्याचे सांगून मी मालिका सोडली आहे. यावर कुबल यांनी सांगितले की, परीक्षेमुळे चित्रीकरण करू शकत नाही असे कारण प्राजक्ताने अनेकदा सांगितले आहे. पण, सध्याच्या काळात सतत कोणत्या परीक्षा होत आहेत याबद्दल सगळ्यांनाच शंका आहे. सेटवर अनेकदा ती उशीरा येत होती. चित्रीकरणासाठी अनेक सीनिअर कलाकार तासनतास तिची वाट बघायचे. तिच्या उशीरा येण्यामुळे अनेकदा शूटिंगला उशीर झाला आहे.