दिल्लीतील हिंसाचारामागे संघाचा ‘हात’, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील दंगल हा विषय आता आणखी चिघळताना दिसत आहे. यावरुन आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. सीएए कायद्याविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला दंगलीचे स्वरुप प्राप्त झाले. दिल्लीतील दंगल पूर्वनियोजित होती. या दंगलीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

नाभिक समाजाच्या मेळाव्यामध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी हा आरोप केला आहे. दिल्लीतील दंगलीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचा खळबळजनक आरोप करताना दिल्लीतील दंगल पूर्वनियोजित होती, अशा दंगली पुन्हा झाल्या तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही असे ही प्रकाश आंबेडकर म्हणाले. एका अहवालानुसार 25 लाख सैनिकांचे गणवेश विकण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यातील मंत्र्यांना ही गावरान सत्ता वाटते. त्यामुळे त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन काळजीचं कारण नसल्याचे विधान करायला सुरुवात केली आहे. या मंत्र्यांनी हे प्रश्न केंद्राचे आहेत आणि त्यात राज्य काही करु शकत नाही हे वायफळ विधान करण्यापूर्वी समजून घ्यायला हवं.

सत्तेसाठी जगू न शकणारी मंडळी प्रश्नाचं गांभीर्य घालवत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबाबत अपुऱ्या माहितीच्या आधारे राज्यातील मंत्री वायफळ बडबड करत आहेत. त्यांनी ही विधानं अडचणीची असून नागरिकत्व गेल्यावर एक दिवस लोकच या मंत्र्यांच्या पाठी दगडं घेऊन लागतील असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

सीएए प्रकरणावरुन आरोप करताना ते म्हणाले, सीएए कोणताही धोका नसल्याचे इतर मागसवर्गीय समाजाला सांगितले जात आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर बाहेरील देशातील नागरिकांना हाकलल्यावर त्यांनी मालमत्ता इतर मागासवर्गात वाटून दिली जाणार असल्याचे आमिष दाखवण्यात येत आहे. सीएए कायद्याची सत्य माहिती समजावी म्हणून इतर मागासातील लहान – लहान जातींचे मेळावे व बैठक घेण्यास सुरुवात केल्याचे ते म्हणाले.

सोलापूर लोकसभा पोट निवडणूकीची शक्यता ही त्यांनी फेटाळली. यावर बोलताना ते म्हणाले, सोलापूर लोकसभेचे खासदार सिद्धेश्वर स्वामी यांच्या खासदारकीची पाच वर्ष न्यायालयीन लढाईत जातील, त्यामुळे ही लोकसभा पोटनिवडणूक होणे शक्य नाही.

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पावर देखील टीका केली. अर्थसंकल्पात 8 हजार कोटी रुपयांची तूट दाखवण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र ही तूट 16 हजार कोटी रुपयांची आहे. राज्याने दाखवलेली 8 हजार कोटींची तूट आणि केंद्राकडून मिळणारे 8 हजार कोटी अशी एकूण 16 हजार कोटी रुपयांची प्रत्यक्ष तूट असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. सत्तेसाठी राज्यातील काँग्रेस आघाडीची शिवसेनेमागे फरफट सुरु असल्याची टीका देखील त्यांनी केली.