वीजबील माफीचा कंपनीचा प्रस्ताव एका मंत्र्याने दाबून ठेवला, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन :  राज्यात 50 टक्के वीज बिल माफ होऊ शकते, असा प्रस्ताव वीज कंपन्यांनी दिला होता. पण हा प्रस्ताव राज्याच्या एका मंत्र्याने दाबून ठेवला, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.

वीज वापरली असेल तर त्याचे बिल भरावेच लागेल या उर्जामंत्री राऊत यांच्या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यात वीज बील माफीच्या मुद्दयावरून चांगलेच राजकारण तापले आहे. बिलात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी याआधी नांदेड येथील पत्रकार परिषेदत उपस्थित केला होता. यासोबतच राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

अकोला येथे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. राज्याचा कारभार मुख्यमंत्री चालवत आहेत की एखादा मंत्री? याचे उत्तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी द्यावे असे ते म्हणाले. तसेच कुणीही वीज बिल भरू नये. ज्यांची वीज कापली जाईल त्यांची वीज जोडून देण्याची जबाबदारी वंचित घेईल, अशी घोषणा आंबेडकर यांनी यावेळी केली.

मनसेही आक्रमक
वाढीव वीज बिल भरले नाही म्हणून वीज कापण्यास कुणी आले तर त्यांना मनसे स्टाईल शॉक देऊ असा इशाराच मनसेनेच्या नेत्यांनी दिला आहे. वीज बिलाच्या मुद्द्यावरुन येत्या काळात मनसेकडून तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यात जनतेकडून बळजबरीने वीज बिल घेतले जाणार असेल तर गाठ मनसेशी आहे, हे लक्षात ठेवा, असा इशाराच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.