पुण्यात आंबेडकर, ओवैसी यांची सभा ; फटका भाजप की काॅंग्रेसला !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांची एकत्रित सभा येत्या रविवारी प्रचाराच्या सांगतेच्या दिवशी पुण्यात होणार असून ही सभा परिणामकारक ठरेल का ? याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पुण्यातील लढत भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात होत असली तरी वंचित बहुजन आघाडीची दखलही घ्यावी लागेल. महाराष्ट्रात मुंबईसह अन्यत्र वंचित आघाडीच्या मोठ्या सभा झाल्या. वंचित आघाडीचे नेते आंबेडकर आणि ओवैसी यांच्या मुंबईतील सभेला विक्रमी गर्दी होती. आघाडीच्या उमेदवारांनी काही मतदारसंघातील राजकीय गणिते बदलून टाकली आहेत. पुण्यातही वंचित आघाडीविषयी उत्सुकता असून आघाडीची उमेदवारी ही भाजप, काँग्रेस यापैकी कोणाला धक्का देणारी ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यातच आता आघाडीची सभा होत असल्याने पुण्याच्या दृष्टीने ती परिणामकारक होईल असे मानले जाते.

पुण्यात २०१४ साली तिरंगी लढत झाली होती. मोदी लाटेमुळे भाजपसमोर अन्य पक्ष टिकले नाहीत. २००९ साली पुण्यात भाजप, काँग्रेस, मनसे, बसपा यांच्यात चौरंगी लढत झाली होती त्या लढतीत काँग्रेसचा निसटता विजय झाला होता. सन २०१९ मध्ये कोणतीही लाट दिसत नाही. भाजप आणि काँग्रेसमधील लढाई ही दोन मित्रांमधील लढाई असल्याने निवडणुकीची हवाच तयार झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अशा राष्ट्रीय नेत्यांच्या सभा पुण्यात झालेल्या नाहीत. त्यामुळे लढतीचा अंदाज येत नाही. अशा वातावरणात वंचित आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांच्यासाठी सभा होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like