प्रकाश आंबेडकरांचा सवाल, म्हणाले – ‘उध्दव ठाकरेंनी सांगावं, महाराष्ट्राचा खरा मुख्यमंत्री कोण ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – “अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत, त्याचा खुलासा करण्यात आला तर अधिक चांगले होईल. नाही तर वीजबिल भरू नका. वीजबिल विरोधात आम्ही आंदोलन सुरू केले असून, येणाऱ्या काळात ते आंदोलन तीव्र करू, असा इशारा आम्ही सरकारला देत आहोत,” असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते मुंबईत वार्ताहरांना बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चुका कबूल केल्या आहेत. आमच्याकडून काही चुका घडल्या असून, त्या दुरुस्ती करून ५० टक्के वीजबिल माफ करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटलं. पण उपमुख्यमंत्री अजित पवार परस्पर सवलत नाकारतात. म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव यांना आम्ही प्रश्न विचारतो, महाराष्ट्राचा खरा मुख्यमंत्री कोण, याचा त्यांनी खुलासा करावा,” अशी टीका त्यांनी केली.

“घरगुती वीजबिलाबाबत सवलत देण्यासाठीची फाईल उद्धव ठाकरे यांच्याकडे का गेली नाही, यासंदर्भात ऊर्जा खात्याने खुलासा करावा. ही फाईल अजित पवार यांच्याकडे जाते. अजित पवार परस्पर मुख्यमंत्र्यांना न विचारता सवलत नाकारतात. मुख्य तर ते अर्थमंत्री असून, त्यांचा अधिकार बजेटबाबत आहे. बजेटच्या बाहेरील प्रश्नांसाठी मुख्यमंत्री आणि कॅबिनेटकडे जाण्याची आवश्यकता आहे,” अशी भूमिका आंबेडकर यांनी मांडली.

“मार्च २०२० साली थकबाकी ५१ हजार ९४६ कोटींवर गेली आहे. मात्र, २०१४ साली हीच थकबाकी अर्ध्यापेक्षा कमी होती. घरगुती वीजबिलावर सूट मागण्यात येत आहे. मार्च महिन्यानंतर वीजबिलात वाढ करण्यात आली. ही वाढ कशासाठी करण्यात आली, याचा खुलासा कुठेही दिसत नाही. महावितरणचे अधिकारी चुका कबूल करत आहेत. टाळेबंदी काळात मीटर रीडिंगचं कंत्राट देण्यात आले होते. त्या कंत्राटाला स्थगिती दिली नाही. पण त्यांना मीटर रीडिंग घेण्यापासून बंदी करण्यात आली. म्हणूनच मीटरचे रीडिंग कन्सोलिटेडरित्या ठरवले. कन्सोलिटेड युनिट ठरला की तुमचा स्लॅब बदलला,” असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.