प्रकाश आंबेडकरांकडून सुशीलकुमार शिंदेंना आव्हान ; सोलापुरात तिरंगी लढत

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक आयोगाने लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम काल रविवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशी राजकीय युद्धाची हालचाल वाढू लागली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकरांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यात जमा आहे. त्यामुळे सोलापूरातून आता तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी पुन्हा एकदा लोकसभेची वाट खडतर झाल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे.

आज सोमवारी अकोला येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सोलापूरच्या उमेदवारी बाबत सूचक वक्तव्य केले आहे. मी सोलापुरातून निवडणूक लढणार आहे. या बद्दल आधीच लक्ष्मण माने यांनी जाहीर केले आहे. त्यावर तुमचा पत्रकार मंडळींचा विश्वास बसत नाही तर मी काय करू असे प्रकाश आंबेडकर म्हणले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून ते स्वतः देखील सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. प्रकाश आंबेडकर यांचे हे विधान खरे झाले तर मात्र सुशीलकुमार यांच्या विजयाची खात्री कोणालाच देता येणार नाही.

सोलापूर मतदारसंघ २००९ च्या लोकसभा निवडणुकीला अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव झाला. त्यावेळी तेथून सुशीलकुमार शिंदे निवडून गेले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा शरद बनसोडे यांनी पराभव केला. काँग्रेसच्या अंतर्गत असणारी गटबाजी आणि मोदी लाट या दोन्हीच्या तडाख्यात सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. मागील एक वर्षांपासून सुशीलकुमार शिंदे आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत मात्र आता प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

सत्ताधारी भाजपचा या मतदारसंघातील उमेदवार अद्याप ठरला नाही. भाजप पक्षश्रेष्ठी विद्यमान खासदार शदर बनसोडे यांच्या कामगिरीवर नाराज आहे. त्यामुळे या मतदारसंघात राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांचे नाव चर्चेत आहे. त्याच प्रमाणे लिंगायत समाजाचे मतदार या मतदारसंघात अधिक असल्यामुळे भाजप गौडगावचे जय सिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याचे देखील बोलले जाते आहे. मात्र भाजपकडून कोणत्याच नावाला अद्याप दुजोरा मिळाला नाही. परंतु या मतदारसंघात भाजपने केलेली कामे पाहता भाजपला या मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळेल असे चित्र आहे. अशा सर्व शक्यता आणि समीकरणामुळे सुशीलकुमार शिंदे यांना लोकसभेचा रस्ता सोपा राहिला नाही.