प्रकाश आंबेडकरांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र, म्हणाले – ‘एकाच लक्ष मुंबईवर अन् दुसऱ्याच बारामतीवर, उर्वरीत महाराष्ट्र वाऱ्यावर’

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. एकाचे मुंबई तर दुसऱ्याचे बारामतीवर लक्ष आहे. उर्वरित राज्य वाऱ्यावर सोडण्यात आले आहे, असे म्हणत आंबेडकरांनी मुख्यमंत्री उध्द्ववा ठाकरे अन् उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही लक्ष्य केले आहे. तसेच हे सरकार म्हणजे सह्याजीराव झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सध्याच्या परिस्थितीत सह्या करण्यासाठी कुणीतरी लागते. सरकार बरखास्त केल तर सह्या कोण करेल? त्यामुळे हे सह्याजीराव सरकार सुरू असल्याचे ते म्हणाले.

अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी राज्यातील ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला. राज्यातील आपातकालीन व्यवस्थेबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत उपचारासाठी उभारलेली यंत्रणा बळकट करण्याऐवजी ती मोडून टाकली. त्यामुळे दुसरी लाट आली तेंव्हा उपचाराविना माणस मेली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकार फोल ठरल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कोरोना संकटात आपातकालीन व्यवस्थापनावर राज्य शासनाला आलेल्या अपयशाबाबत व तिसरी लाट थोपविण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांबाबत मुख्यमंत्र्यांचे मुंबई तर उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीवरच लक्ष आहे. उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काम नाही केल तरी चालेल, पण राज्यातील आपात्कालीन समित्या बळकट करा. त्यामुळे नागरिकांना वेळेवर उपाचाराबाबत व आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत योग्य सल्ला या समित्या देवून मदत करतील असा सल्लाही आंबेडकरांनी राज्य सरकारला दिला आहे.