पंतप्रधानांची मर्जी सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री शांत

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला जात असताना देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काहीही करत नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पंतप्रधानांची मर्जी सांभाळण्यासाठी शांत आहेत. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरात राज्याशिवाय त्यांना इतर कोणतेही राज्य दिसत नाही. ते देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

काँग्रेस-भाजपवर टीका करताना आंबेडकर म्हणाले, काँग्रेस आणि भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोन्ही पक्ष धर्माचे राजकारण करत असून त्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे असे आव्हान ही त्यांनी यावेळी केले. प्रकाश आंबेडकर दिंडोरी येथील सभेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर सडकून टीका करताना म्हणाले, भाजपचे सरकार हे चोर आणि डाकूंचे असून ज्या नोटांवर सरकारची मालकी नाही, पंतप्रधानांची नाही तर गव्हर्नरची सही असते त्या नोटा त्यांनी कशा रद्द केल्या, असा सवाल त्यांनी केला. नियोजना अभावी राज्याच्या विविध भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून मतदारांनी आपल्या प्रश्नांना महत्त्व देऊन तसे धोरण ठरवले पाहिजे. त्यासाठी जात, धर्मविरहित पक्षाला मत दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.