प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेससोबतची संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडी स्थापन करून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे आव्हान उभा करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस सोबत कसलीच आघाडी आता होणार नाही असे जाहीर केले आहे. काँग्रेस सोबत आघाडी करण्याची शक्यता आता मावळली असून आम्ही येत्या १५ मार्चला सर्वच म्हणजे ४८ जागी वचिंत बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले आहे.

काँग्रेस सोबत वाटाघाटीला गेलेल्या वंचितच्या नेत्यांनी आम्ही जाहीर केलेल्या २२ जागा वंचितला देण्यात याव्या अशी मागणी केली. त्यावर काँग्रेसने हि मागणी अव्यवहार्य असल्याचे म्हणत ती मागणी पूर्ण करण्यास नकार दिला. तर काँग्रेसने  वंचित बहुजन आघाडीला फक्त ४ जागासाठी सकारात्मकता दाखवत असल्याचे देखील चित्र आहे. त्यामुळे स्वतः प्रकाश आंबेडकरांनीच त्यांच्यासोबत आघाडी करणार नसल्याचे म्हणले आहे.

दरम्यान  वंचित आघाडीने आपली  १२ जागांची जुनी मागणी २२ जागांवर नेल्याने काँग्रेससोबत आघाडी होण्याची कोणतीच शक्यता शिल्लक नव्हती. म्हणून काँग्रेससोबत आम्ही आघाडी करत नाही याची वंचितकडून फक्त औपचारिक घोषणा करण्याची बाकी होती. ती औपचारिकता आज प्रकाश आंबेडकर यांनी पूर्ण केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या स्वबळावर लढण्याच्या भूमिकेचा काँग्रेस आघाडीला मोठा फटका सहन करावा लागणार आहे.