Coronavirus : महामारी आहे तर मृत्यू दर अर्धा कसा काय ? सामान्यांना रस्त्यावर आणणारं लॉकडाऊन किती दिवस मान्य करायचं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात महामारी आहे तर मग देशातील मृत्यूदर अर्ध्यापेक्षा कमी कसा, असा प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरोना संसर्गावरुन केंद्र सरकारची पोलखोल केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अर्थव्यवस्था मजबूत करायचे सोडून सरकार कोविड कोविड करत असल्याचा आरोप केला होता. गेल्या वर्षीच्या मृत्यूची आणि यंदा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी देऊन प्रकाश आंबडेकर यांनी सरकारला धारेवर धरल आहे.

ट्विट करत त्यांनी म्हटलं, मार्च ते मे २०१९ दरम्यान अंदाजे १,२३,५१२ मृत्यू झाले. तर २०२० मध्ये याच काळात अंदाजे ७४,४१३ मृत्यू झाले. मग महामारी आली असेल तर हा मृत्युदर अर्धा कसा काय झाला ?, असा सवाल करतानाच महामारी नसतानाही सामान्य माणसाला रस्त्यावर आणणारं तसेच जनतेने लॉकडाउन किती दिवस मान्य करायचा असा प्रश्न सुद्धा त्यांनी सरकारला विचारला आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ८० टक्के भारतीय नागरिकांमध्ये कोरोनाविरुद्धच्या अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. तर १५ टक्के लोकांमध्ये त्या तयार होत आहेत. तर उरलेल्या ५ टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीय तयार झालेल्या नाहीत. या लोकांना सरकारने शोधून त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत. पण सरकार त्यांना शोधण्याऐवजी ९५ टक्के लोकांना लॉकडाऊनच्या माध्यमातून वेठीस धरत आहे. सरकारच्या या मनमानी कारभारामुळे छोट्याछोट्या व्यापाराच आणि समाज घटकांचं मोठं नुकसान झालं असून सरकारला त्याच काही पडलेले नसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर लॉकडाऊन ला विरोध करत आहेत. त्याकरता त्यांनी तज्ज्ञांची मते, निरीक्षण आणि आकडेवारीचा हवाला सुद्धा दिला आहे. इतर आजारासारखा कोरोना हा आजार असल्याचे सांगत, त्यासोबत आपल्याला राहावे लागणार आहे. म्हणून आजारासंदर्भातील काळजी घेत जनजीवन सुरळीत केलं पाहिजे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नसल्याचं आंबेडकर म्हणाले.