प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट, चर्चेबाबत म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मातोश्रीवर भेट घेतली. “या बैठकीत 26 डिसेंबरला दादर टीटी भागात आम्ही जे धरणे आंदोलन करणार आहोत, ते आंदोलन शांततापूर्ण मार्गाने व्हावं, तसेच नागरिकत्व कायदा आणि एनआरसी संदर्भात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा बिघडू नये या संदर्भात चर्चा झाली,” असा खुलासा देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, “NRC मुळे हिंदूंमधलाही 40 टक्के समाज भरडला जाणार आहे. भटका विमुक्त समाज हा 12 ते 16% आहे. आदिवासी समाज हा 9 टक्के आहे. आलुतेदार बलुतेदार या सर्वांकडे कुठल्याही पद्धतीचे कागदपत्र नाहीत. त्यामुळे एनआरसी ज्यावेळी लागू होईल त्यावेळी तुमचा जन्म कधी झाला? याची कागदपत्र मिळणार नाही. म्हणून मुसलमानांसोबतच इथला हिंदूही भरडला जाणार आहे. त्याविरोधात आम्ही 26 डिसेंबरला धरणे आंदोलन करणार आहोत.”

आंबेडकर पुढे म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडून प्रचार सुरु आहे की हा कायदा फक्त मुस्लिमांसाठी आहे. पण हे असे नसून हिंदूही इफेक्टेड आहे. भटके विमुक्त 110 वर्षे डिटेनशन कँम्पमध्ये राहिले. आदिवासींच्या सेक्टर मध्ये ब्रिटीश जाऊ शकले नाहीत. या विविध हिंदू समाजाच्या समस्यांबद्दल चर्चा झाली.”

या बैठकीत भीमा कोरेगाव मधील शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एल्गार परिषदेसंबंधित चर्चा देखील झाल्याचे कळते आहे.

1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध असलेल्या लढ्यातील विजयाला 200 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मोठा हिंसाचार झाला होता. त्यानंतर एल्गार परिषदेचे आयोजक असलेल्या लेखक आणि साहित्यकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यासंबंधित चर्चा प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झाल्याचे कळते आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/