मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारने 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांचं नुकसान करणारा असल्याची टीका केली आहे. बोर्ड परीक्षा सुरक्षितपणे घेता येऊ शकतात. बोर्डाच्या परीक्षा घ्याव्या नाही तर राज्य सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, सुरक्षित वातावरणामध्ये परीक्षा घेता येऊ शकतात. मात्र, राज्य सरकारला त्या घेता येत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. दहावी किंवा बारावीच्या परीक्षा या महत्त्वाच्या असतात. बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यास तो विद्यार्थ्यांचं नुकसान करणारा असेल, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. बोर्डाच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात आयोजित केल्या जाऊ शकतात, असेही ते म्हणाले.
10 वी आणि 12 वीच्या परीक्षा महत्त्वाच्या आहेत. सरकार परीक्षा रद्द करणार असेल पुढे ॲडमिशनसाठी इतर परीक्षा होतात. मूल्यांकन कसं करणार हे देखील सरकारने स्पष्ट करावं, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. विद्यार्थ्यांची आपल्याच शाळेत परीक्षा घेता येईल सर्व सुरक्षेचे उपाय करावेत, सरकारकडे कल्पकता नाही. 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं सरकार वाटोळं करत आहेत. सरकारला विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.