‘ॲड. प्रकाश आंबेडकर सोलापूरमधुनचं लढणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे सोलापुरातून लोकसभा लढणार आहेत. त्यामुळे आता सुशीलकुमार शिंदे आणि आंबेडकर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. एमआयएमसोबत भारिपनं हातमिळवणी केली असून सध्या जोरदार प्रचाराला देखील सुरूवात करण्यात आली आहे.

सोलापूर लोकसभेची जागा लढविणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या आठवडय़ात जाहीर केले होते. या गोष्टीवर शिक्कामोर्तब करत प्रकाश आंबेडकर हे सोलापुरातून लढणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीनं यापूर्वी ३७ उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे.

काँग्रेसच्या चिंतेत भर –

सोलापुरात काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे उभे आहेत. प्रकाश आंबेडकर आता सोलापुरातून लढणार असल्यानं सुशीलकुमार शिंदे आणि आंबेडकर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. त्यामुळे सोलापुरातील लढतीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेत सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी ही जागा काँग्रेसच्या खात्यात येईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना होता. मात्र, अचानक आंबेडकरांचं नाव पुढं आल्यानं काँग्रेसच्या चिंतेत भर पडली आहे. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग सोलापुरात असल्याचं मानलं जातं. हे लक्षात घेऊनच भारिपनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.