काँग्रेसच्या पराभवासोबत राजकीय ‘गुलामी’ देखील संपुष्टात : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल सर्वांना आश्चर्यचकित करणारे आले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या पराभवाला मोठा फॅक्टर ठरला तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अस्तित्व. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला येणाऱ्या मतांचे विभाजन झाले. त्याचा फायदा हा भाजपला झाला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचेही बोलले गेले. काँग्रेस-राष्ट्रवादीने शेवटपर्यंत बहुजन आघाडीसोबत युतीसाठी प्रयत्न केले. मात्र जागावाटपांवरुन ही युती झाली नाही.

मात्र आता भारिप बहुजनचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या युती प्रस्तावावर आपले मत व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवासोबत राजकीय गुलामी देखील संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवरच झाली पाहिजे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपाविरोधात एकत्र येत त्यात वंचित बहुचन आघाडीलाही सामावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जागा वाटपांवरून ही युती झाली नाही. वंचित बहुजन आघाडीने स्वतःचे असे ४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यामुळे दलित-मुस्लिम एकी झाली आणि ही मते भाजपला न जाता वंचितच्या पारड्यात पडली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्याचा फटकाही बसला. अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला भरगोस मतं मिळाली. या निवडणुकीत त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली. त्यामुळे राजकारणात आता फक्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हेच नाहीतर वंचित बहुजन आघाडीही आपले पाळेमुळे रुजवत आहे. त्यामुळे सर्वांना त्यांची दखल घ्यावीच लागणार आहे.

prakash ambedkar twitte on congrees lose