इंधन दरवाढीवरून अभिनेते प्रकाश राज यांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘मोदी सरकारला लाज वाटायला हवी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील वाढत्या इंधन आणि गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा दणका बसला आहे. महिनाभरात सिंलिंडरच्या दरात चौथ्यांदा वाढ झाली आहे. दरम्यान यावर अभिनेते प्रकाश राज यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या 3 महिन्यांत गॅस सिलिंडरची किंमत 225 रुपयांनी वाढली असून सरकारला लाज वाटायला हवी असे म्हणत त्यांनी बोचरी टीका केली आहे.

अभिनेता प्रकाश राज यांनी गेल्या तीन महिन्यांत 1 डिसेंबर, 1 जानेवारी, 4, 15, 25 फेब्रुवारी, 1 मार्च रोजी सिलिंडरच्या दरात कशी वाढ झाली याबाबत माहितीची आपल्या ट्विटमधून दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात 100 रूपयांची वाढ झाली होती. यापूर्वी 25 फेब्रुवारी रोजी गॅसचे दर 25 रूपयांनी वाढले होते. त्यापूर्वी 4 फेब्रुवारी रोजी 25 रूपये, त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी 50 रूपयांची वाढ झाली होती. एलपीजीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे. दरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील याबाबत एक ट्विट केले होते. सिलिंडरच्या वाढत्या दरावरून निशाणा साधला होता. एलपीजी सिलिंडरचे दर पुन्हा एकदा वाढले, जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय व्यवसाय बंद करा, चूल फूका, खोटी आश्वासन खा असे ट्विट करत त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते.