‘सत्ता पिपासू लोकांमुळे लोकशाही धोक्यात येईल’ : अभिनेते प्रकाश राज

पोलिसनामा ऑनलाईन – राजस्थानातील सत्ता संघर्षात उच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप प्रलंबित असतानाच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. बहुजन समाज पक्षाने थेट काँग्रेसविरोधात भूमिका घेतली असून, विश्वासदर्शक ठरावावेळी विरोधात मतदान करण्याचे आदेश आमदारांना दिले आहेत. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या या राजकीय घडामोडिंवर अभिनेते प्रकाश राज यांनी संताप व्यक्त केला आहे. या राजकीय डावपेचांमुळे एकदिवस लोकशाहीच धोक्यात येईल, अशी टीका केली आहे.

लोकांनी निवडून दिलेले सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेल्या या मंडळींना लाज वाटायला हवी. यांच्यामुळे एक दिवस लोकशाहीच धोक्यात येईल. अशा आशयाचे ट्विट करुन प्रकाश राज यांनी संताप व्यक्त केला आहे. समाजात घडणार्‍या विविध घडामोडिंवर ते रोखठोक मत मांडतात. या पार्श्वभूमीवर त्यांचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकर्‍यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. राजस्थानमध्ये मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेला सत्ता संघर्ष नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. बंड केलेल्या सचिन पायलट यांनी अद्यापही माघार घेतली नसून, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अधिवेशन बोलावण्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशोक गेहलोत यांनी यासंदर्भात थेट राष्ट्रपतींची भेट घेण्याचा तसेच पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर निदर्शनं करण्याचाही इशारा दिला आहे.