कर्नाटकचा निकाल काहीही लागो भाजपला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागणार : प्रकाश आंबेडकर

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाईन
शिल्पा माजगावकर

कर्नाटक विधानसभेचा निकाल काहीही लागो.. भाजपला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागणार असल्याचं सूचक विधान भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. तसेच आम्ही आमच्या पायावर उभं रहाणार असून कुणाच्या कुबड्या घेण्याची गरज नाही त्यामुळं आमचं अस्थित्व दाखवण्यासाठी पंढरपूर मध्ये 20 मे ला राज्यस्तरीय सत्ता संपादन निर्धार मेळावा आयोजित केल्याचं देखील आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

धनगर समाजाच्यावतीने येत्या 20 मे ला पंढरपूर इथं राज्यस्तरीय सत्ता संपादन निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या मेळाव्याची माहिती देण्यासाठी प्रकाश आंबेकर हे कोल्हापुरात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना टार्गेट करत जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी आंबेडकर म्हणाले, सोलापूरच्या विद्यापीठाच्या नामांतराचा वाद निर्माण झाला नसताना तो वाद जाणीवपूर्वक निर्माण गेला जातोय. या वादात तेल ओतण्याचे काम शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केल. अहिल्या देवीची बदनामी करण्याचा कट आहे. मुख्यमंत्री ,शिक्षण मंत्र्यांनी इतिहासीतील एका व्यक्तीचा अपमान केला आहे.आणि जाहीर माफी देखील त्यांनी मागितली नाही.त्यामुळं विनोद तावडे यांनी प्रायश्चित्त घ्यावं आणि धनगर समाजाची माफी मागावी असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात मी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा दौरा करू आलो त्यावेळी कर्नाटक मध्ये टार्गेट इलेक्शन सुरू असल्याचं निदर्शनास आले. मुख्यमंत्री सिद्धाराम यांना पाडण्यासाठी मोठा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटक विधान सभेचा निकाल काहीही लागो.. भाजपला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागणार असल्याचं देखील आंबेडकरांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्यापासून धनगर समाजाची परिस्थिती जैसे थे आहे. काँग्रेसने धनगर समाजाचे प्रश्न न सोडवता भिजत ठेवलेले आहेत. शासनाने टीस च्या स्टेट्स चा अहवाल लोकांच्या समोर मांडवा आणि धनगर समाजाचा खेळखंडोबा थांबवावा असं सांगत आंबेडकर म्हणाले ,काँग्रेस आणि भाजपने धनगर समाजाचा फुटबॉल केला… एकदा काँग्रेसच्या कोर्टात तर एकदा भाजपच्या कोर्टात… पण आता यातून बाहेर पडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यासाठी 20 मे ला पंढरपूरला राज्यस्तरीय सत्ता संपादन निर्धर मेळावा आयोजित केला असून धनगर समाजाचे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या सरकारला कामगार कायद्यात बदल आणायचा आहे… म्हणून शहरी नक्षलवाद ही संकल्पणा सुरू केलीय.. त्यामुळ कामगार नेत्यांना टार्गेट केलं जातंय असा आरोपही त्यांनी केलाय.

या मेळाव्याच्या माध्यमातून नव्याने मांडल्या जाणाऱ्या नव्या चुलीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं.