औरंगाबाद लोकसभेची जागा एमआयएम लढवणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज (ता.१६) एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याशी आज जागा वाटपावरून चर्चा केली. या दोन नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार एमआयएम औरंगाबादमधून लढण्यास राजी झाला आहे.

औरंगाबाद जागेवर एमआयएमकडून उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर मध्य मुंबई जागाही एमआयएमसाठी सोडल्याचे सांगितले. दरम्यान ओवेसी यांनी दोन दिवसांमध्ये मुंबईच्या जागेबाबत निरोप देतो म्हणाल्याचे आंबेडकर म्हणाले. त्‍यांनी जर दोन दिवसांत याविषयी सांगितले नाही तर आम्ही उर्वरित जागांवरील उमेदवार यादी जाहीर करू असे प्रकाश आंबेडकर यांनी स्‍पष्‍ट केले.

वंचित बहुजन आघाडीने ३७ जागा जाहीर केल्या आहेत, उर्वरित ११ जागा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा करुन जाहीर करु, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमध्ये औरंगाबादची जागा शिवसेनेकडे आहे. यावेळीही विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनाच शिवसेनेकडून तिकीट देण्यात येणार आहे. त्यामुळे खैरेंविरोधात आता जलील मैदानात असतील. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे. आघाडीकडून औरंगाबादसाठी उमेदवार अजून जाहीर झालेला नाही.