प्रत्यक्ष मतदान आणि मोजलेल्या मतांमध्ये मोठा ‘घोळ’ ; प्रकाश आंबेडकरांकडून आंदोलन छेडण्याचा इशारा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी आज ईव्हीएम मशीनवरून गंभीर आरोप केले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांतील प्रत्यक्ष मतदान आणि मोजलेली मते यात तफावत आढळून आली आहे. या फरकाबाबत निवडणूक आयोगाने समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.

देशभरातील अनेक लोक भाजपच्या विरोधात बोलत होते. शेतकरी, बेरोजगार, व्यवसायिक लोकांमध्ये नाराजी असताना भाजप एवढ्या स्पष्ट बहुमताने कसे निवडून आले. अशी लोकांमध्ये निवडणुकांबाबत साशंकता आहे. २०१४ मध्ये ज्याप्रमाणे मोदी लाट होती यंदा ती नसतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर सरकारला मते मिळतात म्हणजे काहीतरी घोळ नक्कीच आहे. राज्यातील ४८ पैकी २६ मतदारसंघांमध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या ही मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा कमी आहे. तर, उर्वरित २२ मतदारसंघांमध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या ही मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा जास्त आहे. म्हणजे यामध्ये काहीतरी घोळ नक्की आहे. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

त्यामुळे आकडेवारीतील फरकाबाबत निवडणूक आयोगाने खुलासा करावा. शिवाय, या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करू नये. कारण निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. असा इशाराही आंबेडकरांनी दिला.

फक्त महाराष्ट्रातच नाहीतर देशभरात ३४२ मतदारसंघात ही तफावत आढळल्याचा दावा त्यांनी केला. तसेच या विरोधात आम्ही ४८ मतदारसंघाच्या ४८ स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचेही ते बोलले.

You might also like