गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांची निवड

सुदीन ढवळीकर, विजय सरदेसाई उपमुख्यमंत्री

पणजी : वृत्तसंस्था – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर आता गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळण्यासाठी भाजपचे प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत, विश्वजीत राणे व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची नावं चर्चेत होती. प्रमोद सावंत हे सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत. मगो पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई या दोघा आमदारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास भारतीय जनता पक्ष तयार झाला आहे.

गोव्यातील राजकीय घडामोडी –
मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात सत्तेसाठी संघर्ष सुरु झाला होता. एकीकडे मोठा पक्ष म्हणून काँग्रेसने राज्यपालांना पत्र लिहून सत्ता स्थापनेचा दावा केला होता तर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु चालू केले होते. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारीच गोव्यात युती सरकारच्या आमदारांसोबत बैठक घेतली होती. सुमारे सहा तास चाललेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता.

गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत होते. पर्रीकर हे पणजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तिथे आता पोटनिवडणूक होईल. पुढील महिन्यांत गोव्यात तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. ४० जागांचे संख्याबळ आता ३६ वर आले आहे. गोव्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार असून, त्यात गोवा फॉरवर्ड पक्ष, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे. या पक्षांनी केवळ पर्रिकर यांच्यासाठीच सरकारला पाठिंबा दिला होता.

प्रमोद सावंत यांचा अल्प परिचय –
प्रमोद सावंत हे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. प्रमोद सावंत हे सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत. प्रमोद सावंत साखळी मतदारसंघाचे आमदार असून ते व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. प्रमोद सावंत यांचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला असून त्यांच शिक्षण कोल्हापूर व पुणे याठिकाणी झालं आहे . कोल्हापूरमधील गंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधून त्यांनी बीएएमएसची डिग्री पूर्ण केली आहे.

तसेच पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून त्यांनी मास्टर ऑफ सोशल वर्कची पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. प्रमोद सावंत यांचे वडील पांडुरंग सावंत हे जनसंघाने नेते होते. त्यांनी पाळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. तसेच प्रमोद सावंतही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. एकदा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या अनुपस्थितीत ध्वजारोहणाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवली होती.

Loading...
You might also like