अटलजींना प्रभावी तर मोदींना वेगानं शिकणारे पंतप्रधान मानत होते प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आता आपल्यासोबत नाहीत. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. २०१२ मध्ये ते राष्ट्रपती झाले आणि २०१७ पर्यंत त्या पदावर राहिले. प्रणव यांचा कॉंग्रेसशी संबंध होता, तरी ते भाजपचे दोन नेते अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून खूप प्रभावित झाले होते. याचा उल्लेख त्यांनी एका कार्यक्रमात केला होता. प्रणव मुखर्जी अटलजींना सर्वात प्रभावशाली, तर मोदींना सर्वात वजने शिकणारे पंतप्रधान मानायचे.

इतकेच नव्हे तर पंतप्रधान मोदींनीही प्रणव मुखर्जी यांची स्तुती करताना म्हटले होते की, जेव्हा मी दिल्लीला आलो होतो तेव्हा प्रणवदा यांनीच बोट धरून शिकवले. २०१७ मध्ये राष्ट्रपतीपदावर जेव्हा प्रणव मुखर्जी यांचा शेवटचा दिवस होता, तेव्हा मोदींनी त्यांच्या नावाने पत्र लिहिले होते- राष्ट्रपती, तुमचा पंतप्रधान म्हणून तुमच्यासोबत काम करणे ही एक सन्मानाची बाब आहे. या पत्रात मोदींनी नमूद केले होते की, प्रणवजी नेहमी मोदींना नेहमी विचारत की आपल्या आरोग्याची काळजी घेत आहात की नाही? हे पत्र प्रणव यांनी ट्विट केले होते आणि ते वाचून मी भावूक झाल्याचे म्हटले होते.

प्रणव यांनी अटलजींशी संबंधित किस्सा सांगितला होता
प्रणव यांनी मार्च २०१७ मध्ये एका कार्यक्रमात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी संबंधित किस्सा सांगितला होता. ते म्हणाले की मी राज्यसभेत होतो. मी अचानक पंतप्रधान माझ्या आसनाकडे येताना पाहिले. मला लाज वाटली. मी म्हणालो- अटलजी, तुम्ही माझ्याकडे यायचा त्रास का घेतला? मला बोलवण्यासाठी तुम्ही इतर कोणाला पाठवायचे होते. अटलजी म्हणाले की काही नाही. आपण मित्र आहोत. यानंतर अटलजींनी मला एक विनंती केली. ते म्हणाले की, जॉर्ज फर्नांडिज हे खूप कष्टाळू आणि सक्षम मंत्री आहेत. त्यांच्यासाठी खूप कठोर होऊ नका. त्यावेळी जॉर्ज संरक्षण मंत्री होते. मी अटलजींना सांगितले की, मला याचे कौतुक वाटते. तुम्ही आपल्या सहकाऱ्याची किती काळजी करता याबद्दल मी तुम्हाला सलाम करतो. ही एक अशी घटना आहे, जी सांगते अटलजी कसे काम करायचे.”

प्रणव यांनी मोदींचेही कौतुक केले होते
ते म्हणाले होते की, मोदींची स्वतःची काम करण्याची पद्धत आहे. त्यांनी पटकन गोष्टी कशा शिकल्या ,याबद्दल आपण त्यांना श्रेय दिले पाहिजे. चरण सिंह ते चंद्रशेखरपर्यंत पंतप्रधानांना फार कमी वेळ काम करण्याची संधी मिळाली. या लोकांना संसदेमधील चांगला अनुभव होता, परंतु एखादी व्यक्ती थेट राज्य प्रशासनाकडून येते आणि येथे येऊन केंद्र सरकारचे प्रमुख बनते. त्यानंतर ते इतर देशांशी संबंध आणि बाह्य अर्थव्यवस्थेत हुशार होतात.

प्रणव म्हणाले होते की, २००८ च्या आर्थिक मंदीनंतर एक शक्तिशाली संस्था जी-२० म्हणून उदयास आली. दरवर्षी आणि कधीकधी वर्षातून दोनदा जी-२० ची बैठक होत असते. ते मोठ्या मुद्द्यांचा सामना करतात. कोणत्याही पंतप्रधानांना त्याचे सखोल ज्ञान घ्यावे लागते. मोदींनी ते केले. मोदी गोष्टींचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करतात. मला त्यांची ही गोष्ट आवडली, जेव्हा ते म्हणाले की निवडणूक जिंकण्यासाठी तुम्हाला बहुमताची आवश्यकता असते, पण सरकार चालवण्यासाठी प्रत्येकाच्या मताची गरज असते.

मोदी म्हणाले होते की- प्रणव यांनी बोट धरून गोष्टी शिकवल्या
जुलै २०१६ मध्ये राष्ट्रपती भवन संग्रहालयाच्या दुसर्‍या टप्प्याच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधान मोदींनी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासाठी म्हटले होते की, जेव्हा मी दिल्लीला नवीन आलो होतो, तेव्हा राष्ट्रपतींनी मला बोट धरून गोष्टी शिकवल्या होत्या. मला मिळालेली संधी फारच कमी लोकांना मिळते.

मोदी म्हणाले होते की, सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांची राजकीय पार्श्वभूमी वेगळी आहे आणि माझी वेगळी आहे, पण त्यांच्याबरोबर मला शिकले कि भिन्न राजकीय विचारसरणी असतानाही लोकशाहीत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम केले जाऊ शकते.

मागील वर्षी भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना गेल्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. मुखर्जी हे सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पाचवे राष्ट्रपती होते. यापूर्वी राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. झाकीर हुसेन आणि व्हीव्ही गिरी यांना हा पुरस्कार मिळाला आहे.