प्रणव मुखर्जी पुण्यातील ‘या’ एकाच कार्यकर्त्याला ओळखत अन् त्याला ‘बच्चू’ म्हणून हाक मारत !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे तसे कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. त्यांचे पुण्यातील एका कार्यकर्त्यासोबत चांगलेच स्नेहसंबंध जुळले होते. हा कार्यकर्ता 6 फूट उंच उपमहाराष्ट्र केसरी म्हणून ख्याती मिळवणारा पैलवान होता. या कार्यकर्त्याचं नाव आहे विलास इंगवले.

राजकारणात आल्यानंतर मुळशी तालुका काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची आणि प्रणव मुखर्जी यांची ओळख झाली होती. एका चित्रपट दिग्दर्शकानं थेट त्यांना प्रणव यांच्या कोलकात्यातील घरी नेले. इंगवलेंचं रांगडं व्यक्तिमत्व मुखर्जी यांना खूप आवडलं. याचं ओळखीचं रुपांतर स्नेहात झालं. प्रणव मुखर्जी त्यांना बच्चू म्हणून हाक मारत. इंगवले सध्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना सपर्क केला असता त्यांनी प्रमुख मुखर्जींच्या आठवणींना उजाळा दिला.

इंगवले म्हणाले, “त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी मला नेहमी त्यांच्यासोबत टेबलावर जेवायला बसवलं. लग्नाला (मुखर्जींच्या मुलाच्या) गेल्यावर त्यांनी मला 2 दिवस मुक्कामी ठेवून घेतलं. त्यांचा मुलगा आणि सून हेदेखील माझ्या घरी भेटीसाठी आले होते. दुर्धर आजारामुळं मला राजकारणातून बाहेर पडावं लागलं. हालचालींवर मर्यादा आल्या. बोलणंही अवघड झालं. त्यामुळं नंतर माझं जाणं झालं नाही.” इंगवले पुढं म्हणाले, “ते राष्ट्रपतीपदी असताना त्यांचा मला दोन वेळा फोन आला होता. उपचारासाठी आणि मदतीसाठी त्यांनी विचारणा केली होती. त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं प्रेम मला लाभलं हे माझं भाग्यच आहे.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.