जे. जे. रूग्णालयात मातृवंदना योजनेचा लाभ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारची मातृवंदना योजना आता मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात सुरू कऱण्यात आली आहे. केवळ पहिल्या अपत्यासाठी या योजनेचा लाभ महिलांना मिळणार आहे. मुंबईतील सर जे. जे. रूग्णालयात जन्मणाऱ्या पहिल्या अपत्याच्या मातेला आता पाच हजार रूपये मिळणार आहेत. लवकरच ही योजना महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयात सुरू  करण्यात येणार आहे.

माता आणि बालकांचं आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला आण स्तनदा मातेला सकस आहार मिळावा यासाठीच केंद्र सरकारनं प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली आहे. या योजनेची सुरूवात महाराष्ट्रात १ जानेवारी २०१८ पासून झाली. या योजनेतंर्गत गरोदरपणात मातांना पाच हजार रुपये आधार संलग्न खात्यात जमा करण्यात येत आहेत. या योजनेद्वारे पाच हजार रुपयांचा निधी तीन टप्प्यात मातांना मिळणार आहे. गरोदरपणाची नोंदणी मासिक पाळी चुकल्यानंतर सरकारी रुग्णालयात १०० दिवसांच्या आत केल्यावर महिलेच्या बँक खात्यात एक हजार रुपये जमा होतील. गर्भारपणात सहा महिन्यात प्रसूतीपूर्व चाचणी केल्यास दोन हजार रुपये मिळतील. प्रसूती झाल्यानंतर बाळाचं शेवटचं लसीकरण असेल, त्यावेळी दोन हजार रुपये खात्यात जमा होतात.

फक्त पहिल्या बाळंतपणासाठी मातेला या योजनेचा लाभ मिळेल. पहिला, दुसरा व तिसरा लाभ मिळावा यासाठी ओळखपत्र, आधारकार्ड, मातेच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पासबुक शक्यतो राष्ट्रीयकृत बँकेचे असावं. पतीचं आधारकार्ड, बाळाच्या जन्माचा दाखला, माताबाल संरक्षक कार्ड यांची प्रत रुग्णालयातील समाजसेवा अधिक्षक यांच्याकडे जमा करावी लागेल. या व्यतिरिक्त जननी सुरक्षा योजनेतंर्गत त्या योजनेच्या निकषानुसार अतिरिक्त लाभ देखील मातांना मिळणार आहे.