‘एकाधिकारशाही काय असते हे खडसेंना लवकरच समजेल’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपमध्ये एकाधिकारशाही असल्याचा आरोप केला होता. खडसे यांच्या आरोपावर भाजपचे (bjp) प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड (prasad lad) यांनी पलटवार केला आहे. भाजपमध्ये एकाधिकारशाही नाही आणि कधीच नव्हती. एकाधिकारशाही काय असते हे आता खडसेंना लवकरच समजेल, असा टोला प्रसाद लाड लगावला आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा करताना भाजपमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाल्याचा आरोप केला होता. पूर्वी सामूहिक निर्णय घेतले जात होते आता केवळ देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) निर्णय घेतात आणि ते पक्षावर लादले जातात, असे खडसे यांनी म्हटले होते. खडसे यांच्या वक्तव्याला प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपमध्ये कधीच एकाधिकारशाही नाही, हे खडसेंना माहीत आहे. त्यामुळे एकाधिकारशाही काय असते हे ज्या पक्षात जात आहेत. तिथे त्यांना कळेलच, असं लाड म्हणाले.

प्रसाद लाड पुढे म्हणाले की, एकनाथ खडसे ज्या पक्षात जात आहेत. त्या पक्षाचा पूर्व इतिहास आणि पक्षातील एकाधिकारशाही अनुभवावी. त्यानंतर जनतेसमोर येऊन सल्ला देण्याचे काम खडसे यांनी करावे, असा टोला लाड यांनी खडसे यांना लगावला आहे. तसेच खडसे यांनी फडणवीस आणि भाजपवर जे आरोप केले आहेत ते चुकीचे असल्याचे सांगत खडसे यांनी आत्मचिंतन करावे असा सल्ला लाड यांनी दिला आहे. एखाद्याची स्वप्न जर त्याच्या इच्छेच्या पुढे जात असतील तर त्याला कोणीच आळा घालू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.