Prasad Oak : ‘मराठी सिनेमाच्या स्क्रीनसाठी भिका मागाव्या लागतात, ही लांछनास्पद गोष्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   काळानुसार मराठी सिनेसृष्टीने देखील कात टाकली. मराठी सिनेमांचे विषय, त्यांची धाडणी, सिनेमाची कथा यात अनेक प्रयोग होवू लागले आहेत. मात्र असं असंलं तरी आजही मराठी सिनेमांकडे फार कमी लोक वळताना दिसतं आहेत. शिवाय मराठी सिनेमांचा चित्रपटगृहांसाठी असलेला लढा कायम आहे. गेल्या काही वर्षात मराठी सिनेसृष्टीत अनेक दर्जेदार मराठी सिनेमा आले. या सिनेमांना प्रेक्षकांची मोठी पसंतीदेखील मिळाली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये ‘पिकासो’ला अन्य दोन चित्रपटांसह चित्रपटांच्या विशेष उल्लेखनीय श्रेणीत गौरवण्यात आलंय. गेल्या काही वर्षात अनेक मराठी सिनेमांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली छाप पाडली आहे. तसचं अनेक सिनेमांनी इतर नावाजलेल्या पुरस्कारांवर आपलं नावं कोरलं आहे. यातच यंदाच्या वर्षीदेखील पुन्हा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. यातील एक उल्लेखनीय सिनेमा म्हणजे ‘पिकासो’. गेल्या काही दिवसात ‘पिकासो’ सिनेमाची मोठी चर्चा रंगू लागली आहे.

दशावतार या पारंपारिक कलाप्रकाराच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचं कथानक आहे. या सिनेमात अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक, बालकलाकार समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम हे प्रमुख भूमिकेत आहेत. मराठी सिनेमांकडे कमी प्रेक्षक वळत आहेत यावर बोलताना प्रसाद म्हणाला,” गेल्या १०-१५ वर्षात अनेक मराठी उत्तम सिनेमा आले. यात ‘बालगंधर्व’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘टाईमपास’, ‘हिरकणी’, ‘फर्जंद’, ‘आनंदी गोपाळ’ अशा विविध धाटणीचे दर्जेदार चित्रपट मराठीत येत आहेत. त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळतो.” मराठी सिनेमा चालत नाही अशी ओरड करण्याआधी मराठी माणसानेच आधी विचार करण्याची गरज आहे .मराठी माणसंचं हिंदीला आधी प्राधान्य देतात. जर महिन्यात तुम्ही एक चित्रपट पाहत असाल तर पहिला विचार मराठी चित्रपटाचा का होत नाही? मग मराठी सिनेमाल चित्रपटगृह मिळत नाही किंवा ते चालत नाही याचा आरडाओरड करण्याला अर्थ नाही. जर मराठीत चांगले सिनेमा बनत नाही अशी ओरड असेल तर ते खोटं आहे.” असं तो म्हणाला.

पुढे मराठी सिनेमा पाहताना प्रेक्षक साहित्याचा विचार करतात हे सांगताना प्रसाद म्हणाला, ” प्रत्येक मराठी सिनेमा उत्तम बनत नाही हे मी प्रमाणिकपणे नमूद करतो. मात्र हे हिंदीतही आहे. हिंदीतही प्रत्येक सिनेमा उत्तम बनत नाहीत. तिथेही वाईट सिनेमा असतात. मात्र त्यात मोठी स्टार कास्ट असते, ग्लॅमर असतं, पैसा खर्च केलेला असतो, परदेशात शूटिंग केलेलं असतं त्यामुळे लोकांना त्याच आकर्षण असतं म्हणून ते पाहायला जातात. मात्र त्यावेळेला तुमचं साहित्यावरचं प्रेम कुठे जातं? जयवंत दळवी, बालगंधर्वांवरचं प्रेम कुठे जात? कानेटकरांनरचं प्रेम कुठे जातं ?” असा सवाल प्रसादने उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट निर्मात्यांचा हक्कच आहे चित्रपटगृहांवर. त्यामुळे पहिलं प्राधान्य त्याला मिळालंच पाहिजे मग हिंदीला मिळालं पाहिजे आणि अशी मागणी जर निर्माते- दिग्दर्शकांची असेल तर त्यात काहीही गैर नाही. ” असं मत प्रसादने व्यक्त केलं आहे. तसेच मराठी सिनेमांसाठी चित्रपटगृहांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल प्रसाद म्हणाला, ” सगळ्यात आधी मराठी माणसाने विचार करायला हवा की आपण मराठी सिनेमांना प्राधान्य देतो का? आणि जर प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि राजकर्त्यांनीही याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक सिनेमासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांना स्क्रीनसाठी भिका मागाव्या लागतात ही अत्यंत लाजिरवाणी आणि लांच्छनास्पद गोष्ट आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेमांना चित्रपटगृहात स्क्रीनसाठी भांडावं लागतं. अनेकदा अनेक पक्ष पाठिंबा देत आंदोलनं करतात. “मात्र आंदोलन का करावी लागतात? मराठीला स्क्रीन दिलीच गेली पाहिजे. असे निय़म असूनही चित्रपटगृह ते पायदळी तुडवतात. याकडे कोण का लक्ष घालत नाही?” असे प्रश्न यावेळी प्रसादने व्यक्त केले आहेत. दरम्यान, या सिनेमात प्रसादने एका शिल्पकाराची भूमिका साकारली आहे. पांडुरंग गावडे असं त्याच्या भूमिकेच नाव आहे.