जय श्रीराम ! जगभरातील राम भक्तांना मिळणार आयोध्येच्या मंदिरातील ‘प्रसाद’, दुतावासांमार्फत वाटण्यात येणार 1 लाख 11 हजार ‘लाडू’

लखनऊ/उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था –   सध्या अयोध्या नगरी रामनामाच्या भक्तिसागरात तल्लीन झाली आहे. अयोध्येत येत्या 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. यासाठी अयोध्येत सर्वत्र मोठ्या प्रमाणात जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्येतील प्रत्येक गल्ली, प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक भिंतीची रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. तसेच भूमिपूजनादिवशी प्रभू रामाला नवीन पोशाख घालण्यात येणार असून त्याची देखील तयारी करण्यात आली आहे.

याच दरम्यान, राम मंदिराच्या पूजेसाठी अयोध्येत लाडू नैवेद्य आणि प्रसाद म्हणून वाटण्यासाठी मणिराम दास यांच्या छावणीकडून तब्बल 1 लाख 11 हजार लाडू तयार केले जात आहेत. हे लाडू स्टीलच्या डब्यात पॅक करण्यात येत आहे. भूमिपूजनादिवशी प्रभू रामांना नैवेद्य दाखवल्यानंतर हे लाडू सर्व अयोध्येत आणि दुतावासांमार्फत जगभरात पाठवले जाणार आहेत. तसेच इतर तीर्थ क्षेत्रात प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे येत्या 5 ऑगस्ट रोजी 11 वाजता भूमिपूजन करतील. या भूमीपूजनाची जय्यात तयारी अयोध्येत सध्या सुरु आहे. अयोध्येत 500 वर्षांनी येणाऱ्या या दिवसाला एक विशेष दिवस बनवण्यासाठी श्री राम जन्मभुमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून दिवाळीसारखे वातावरण तयार करण्यात येत आहे. तर दुसरीकडे दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा आणि बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या देशांच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यांच्या सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले, राम जन्मभूमी कॅम्पसमध्ये पंडितांची एक टीम 3 ऑगस्टला अनुष्ठान आणि पुजेचा कार्यक्रम सुरु करणार आहे. 3 ऑगस्टला गणेश पुजेसह उत्सव सुरु केला जाणार असल्याचे मिश्रा यांनी सांगीतले. अयोध्येत 5 ऑगस्टला सकाळी 8 पासून पूजन व अनुष्ठान सुरु होईल. काशीच्या विद्वान 11 पंडितांच्या टीमकडून हे पूजन केले जाईल. हीच टीम नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन करणार असल्याचेही मिश्रा यांनी सांगितले.