अवमान केल्या प्रकरणी प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टानं ठोठावला दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वरिष्ठ वकिल प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायलयाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रशांत भूषण यांना न्यायालयानं 1 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड न दिल्यास त्यांना 3 महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होणार असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

भूषण यांनी विद्यमान आणि माजी सरन्यायाधीशांबद्दल जे ट्विट केलं होतं त्या वादग्रस्त ट्विटसंदर्भातील हे प्रकरण आहे. 14 ऑगस्ट रोजी प्रशांत भूषण यांचं या ट्विटवरील स्पष्टीकरण कोर्टानं फेटाळलं होतं. अवमान केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवलं होतं. भूषण यांना बिनशर्त माफी मागण्यास कोर्टानं वेळ दिला होता. दंड अथवा शिक्षेला सामोरं जाईन परंतु माफी मागणार नाही अशी भूमिका प्रशांत भूषण यांनी स्विकारली होती. यानंतर कोर्टानं त्यांना 1 रुपया दंड आकारला होता.

प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास का दिला नकार ?

प्रशांत भूषण म्हणाले की, न्यायालय ही संस्था भरकटताना दिसत असेल तर त्याविरोधात आवाज उठवणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळं मी चांगल्या भावनेनं मत व्यक्त केलं आहे. सुप्रीम कोर्ट किंवा सरन्यायाधिशांच्या अवमानासाठी नाही.

प्रशांत भूषण असंही म्हणाले, माझे ट्विट प्रामाणिक विश्वासाचे प्रतिनिधित्व करतात. मी तेच विचार व्यक्त केले आहेत ज्यावर मी कायम विश्वास ठेवतो. त्यामुळं मी व्यक्त केलेल्या विचारांबद्दल शर्तीसह किंवा बिनशर्त माफी मागणं हे दांभिकपणाचं ठरेल असं म्हणत त्यांनी माफी मागण्यास नकार दिला होता.