‘अदानी अन् अंबानींच्या तुकडयांवर जगणारे लोक शेतकर्‍यांना तुकडे-तुकडे गँग म्हणताहेत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   नवे तीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी गेल्या २१ दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व भाजपावर सडकून टीका करण्यात येत आहे. त्यातच आता “अदानी आणि अंबानींच्या तुकड्यांवर जगणारे लोक शेतकऱ्यांना तुकडे तुकडे गँग म्हणत आहेत,” अशा शब्दांत ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

प्रशांत भूषण आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत म्हणाले, “अदानी आणि अंबानींच्या तुकड्यांवर जगणारे लोक आज आपल्या शेतकऱ्यांना तुकडे तुकडे गॅंग म्हणत आहेत. आता मोदी चौकीदार आहेत हे मान्यच करावं लागेल. प्रश्न फक्त एवढाच आहे की ते चौकीदारी कोणाची करतात, अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची,” असे सांगत त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.

शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याची हिम्मत कशी झाली?

दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या आंदोलनांत खलिस्तानी असल्याची अफवा उठवली होती. त्यावरुन शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी आक्रमक भूमिका घेता, या आंदोलनात बऱ्याच वयस्कर महिला सहभागी झाल्या असून, त्या खलिस्तानी दिसतात का? देशातील शेतकऱ्यांना असे संबोधित करण्याची काही पद्धत आहे का? हा शेतकऱ्यांचा अपमान आहे, असे म्हटले होते. पुढे बोलताना ते म्हणाले, “त्यांची आमच्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याची हिम्मत कशी झाली ? शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याचा हक्क भाजपाला अथवा अन्य कोणाला कुणी दिला? शेतकऱ्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले. आपण त्यांना देशद्रोही म्हणत आहे? जे त्यांना देशद्रोही म्हणत आहेत, ते स्वतः गद्दार आहेत,” असा निशाणा त्यांनी भाजपावर साधला होता.