“निवडणूक हे एक युद्धच , मला यात कधी ‘इंटरेस्ट’ नव्हता”

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राज्यात अहमदनगरची लोकसभेची जागा चर्चेत आहे. राष्ट्रावादीने जागा सोडण्यास नकार दिल्याने काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसंच नगरमध्ये राष्ट्रवादीकडून माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती. पंरतू प्रशांत गडाख यांनी यावर आपला निर्णय जाहीर केला आहे. मी निवडणूक लढणार नाही, असं प्रशांत गडाख यांनी सांगितलं आहे. तसंच यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून विविध वर्तमानपत्रांमधुन आणि जनमाणसांमधून मी लोकसभेचा उमेदवार असणार याच्या चर्चा झाल्या. आदरणीय गडाख साहेबांवर आणि माझ्यासारख्या छोट्याशा व्यक्तीवर एवढं प्रेम आहे याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. माझ्या कुटुंबातील प्रत्येकांनी मी लढावं, असा सल्ला दिला आहे. खरं म्हणजे निवडणुक हे एकप्रकारचं युध्द समजल जातं, दोन मोठी कुटुंब लढणार आणि युध्द होणार अश्या चर्चाही त्यामुळे घडत असतात. आणि त्या स्वाभाविकही असतात. का कोण जाणे… पण मला अशा युध्दात कधीच इंटरेस्ट वाटला नाही, असं त्यांनी म्हटलं.

 राजकारण हे चांगलं की वाईट क्षेत्र आहे, यावर खूप चर्चा होवू शकतात. पण आज मला हे निश्चितच जाणवलं की, हे क्षेत्र खुपच असंवेदनशील झालेलं आहे. आणि मग मी त्यात का पडावं, हे मानसिक द्वंद्व सुरु आहे, असेही त्यांनी सांगितलं.

मला माझे मित्र, सर्व पक्ष, संघटना, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य समाज या सगळ्यांकडून लोकसभा लढवण्याचा आग्रह झाला. पण मी सध्या तरी राजकारणात न पडण्याचा निर्णय घेत आहे. पराभव आणि विजय मी याचा कधीच विचार केला नाही. कारण पराभव काय आणि विजय झाला काय, तो नवनिर्मितीचा असला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. माझ्या मनातल्या या सगळ्या वैचारिक घुसळणीतुन आज मी एक निर्णय घेतलायं, संपुर्ण अहमदनगर जिल्ह्यासाठी मला एक व्हिजन तयार करायचं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मला या काही दिवसांत जिल्ह्यातील सर्व स्तरांवरून जे प्रेम मिळालं, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. त्याप्रती कर्तव्य भावनेतुन आणि माझ्या नवनिर्मितीच्या स्वभावानुसार राजकारणातलं एखादं पद घेऊन काम करण्यापेक्षा संपुर्णतः अराजकीय परंतु सर्व राजकीयपक्षांना सोबत घेवुन, व्हिजनच हे अवघड वाटणारं पण अशक्य नसणारं काम मी हाती घेणार आहे. प्रचंड विश्वासाने मी हे व्हिजन तयार करुन त्याच्या फलितासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तसंच आपण ज्या पिढीच्या खांद्यावर बसून वाढलो,त्या पिढीला साक्षी ठेवून आणि येणारी पुढची पिढी आपल्याला काहीच केलं नाही असं म्हणू नये, ही भावना ठेवून हे आपल्या सर्वांना मिळून करायचयं. त्यासाठी तुमची साथ होतीच, आताही आहे आणिइथुन पुढेही राहील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.