राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच जगतापांचा भाजपवर निशाणा; म्हणाले – ‘येत्या निवडणूकीत मनपाची सत्ता ताब्यात घेणारच’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच प्रशांत जगताप यांनी भाजपवर टीका केली. ‘गेल्या साडेचार वर्षांतील भाजपचा कारभार चव्हाट्यावर आणण्याची संधीच राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणून मिळाली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महापालिकेतील सत्ता ताब्यात घेणारच’ असा निर्धार जगताप यांनी केला.

प्रशांत जगताप यांनी हिराबाग चौक येथील पक्ष कार्यालयात मावळते शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांच्याकडून पदाची सूत्री स्वीकारली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘भाजपच्या पूर्वी सलग 10 वर्षे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता होती. आम्ही जाहीर केलेल्या कामांचीच उद्घाटने सत्ताधारी भाजप आत्ता करत आहे. उपनगरांमध्ये भाजपचे वर्चस्व आहेच. 33 गावांचा समावेश त्यांच्याच सरकारच्या कार्यकाळात झाला. आम्ही तिथेच काय, पण शहराच्या मध्यभागातही जोर दाखवू. हे तर काहीच कामाचे नाहीत असा रोष पुणेकरांचा भाजपवर आहे, असे म्हणत सत्तेच्या काळात भाजपने त्यांचे म्हणून केलेले एकतरी काम दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

तसेच आम्ही महापालिकेतील प्रमुख विरोधक आहोतच, तरीही कोरोना काळात आमचे त्यांना चांगल्या कामासाठी सहकार्य राहीलच. पण भ्रष्टाचार, लुटालूट खपवून घेतली जाणार नाही. संघटन वाढवणाऱ्यांवर भर देणार असून, पक्षाचा तळागाळात पाया आहे, तो विस्तार करण्याला प्राधान्य असणार आहे, असेही ते म्हणाले.