बंगाल सरकारच्या ‘गोपनीय’ फाईली प्रशांत किशोर पाहतात, भाजपाचा आरोप

कोलकत्ता : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. निवडणुक रणनितीकार प्रशांत किशोर व त्यांच्या टीमचे सदस्य राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करत असून विविध विभागातील गोपनीय फाईली पहात असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. त्याचा तृणमूल व किशोर यांनी इन्कार केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान व मतदानाच्या दिवशी भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्या दरम्यान मोठा रक्तपात झाला होता. भाजपाने प्रथमच पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारली आहे. आता २०२१ मध्ये बंगालमधील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तारुढ तृणमूल काँग्रेस आणि किशोर यांची संस्था द इंडियन पॉलिटिकल ऐक्शन कमेटी (आई पैक) यांच्या करार झाला आहे.

भाजपाचे राज्य महासचिव सायंतन बसु यांनी सांगितले की, प्रशांत किशोर आणि त्यांच्या टीमचे सदस्य फीडबॅक घेण्यासाठी सरकारी कार्यालयाचा दौरा करीत आहेत. तेथील अधिकाऱ्यांना आदेश देऊन गोपनीय फाईली पहात आहेत. त्यांनी निवडणुकीसाठी करार केला असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही. पण त्यासाठी सरकारी यंत्रणा राबविली जात असून राज्य सरकारची गोपनीय माहिती बाहेर जात असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेता पार्थ चटर्जी यांनी सांगितले की, भाजपाचे आरोप तथ्यहीन आहेत. असे काही होत नाही. कोणीही सरकारी कामकाजात हस्तक्षेप करीत नाहीत. निवडणुका २०२१ मध्ये असल्या तरी भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांना आतापासून त्याचे वेध लागल्याचे दिसून येऊ लागले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –