‘या’ चाणक्याने चंद्राबाबूंची सत्ता उलथवली !

हैदराबाद : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक पार पडली आणि  भाजपने २०१४ च्या तुलनेत अधिक जागा जिंकत पुन्हा आपली सत्ता राखली. त्याचबरोबर आंध्रप्रदेशात लोकसभेबरोबरच विधानसभेसाठी सुद्धा मतदान पार पडले. त्यात जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसने दोन्ही ठिकाणी मोठे मताधिक्य प्राप्त करत विजया मिळवला. यात त्यांना साथ मिळाली ती राजकीय चाणक्य आणि निवडणूक रणनीतीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर यांची. त्यांच्या काटेकोर नियोजनामुळे आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसने चंद्राबाबू नायडूंची सत्ता उलथवून लावण्यात यश आले आहे.

विधानसभेत  जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसने १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवत राज्यात एकहाती सत्ता मिळवली. आणि लोकसभेत २५ पैकी २३ जागांवर विजय मिळवत चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीचा धुव्वा उडवला. त्यामुळे प्रशांत किशोर पुन्हा चर्चेत आले आहेत. याच प्रशांत किशोर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत  नरेंद्र मोदींसाठी काम केले होते. त्यानंतर विविध राज्यात काँग्रेस आणि भाजपसाठी काम केले. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत  त्यांनी काँग्रेससाठी काम केले, मात्र त्यात त्यांना अपयश आले. मात्र आता पुन्हा त्यांनी मोठी कामगिरी करत आपले लक्ष वेधून घेतले आहे.

जगनमोहन रेड्डी यांनी हैदराबाद येथील आपल्या निवासस्थानी प्रशांत किशोर यांच्यासोबत निवडणूक निकाल पाहिला. त्यांच्या पक्षाने राज्यात २५ पैकी २३ लोकसभा आणि १७५ पैकी १५० विधानसभा जागांवर विजय मिळवला.

दरम्यान, यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि,“आंध्रप्रदेश आणि सर्व सहकाऱ्यांच्या एकतर्फी विजयाबद्दल शुभेच्छा, नवीन मुख्यमंत्र्यांनाही खूप खूप शुभेच्छा”.त्यामुळे प्रशांत किशोर आणि जगनमोहन रेड्डी यांच्या या कामगिरीमुळे  वायएसआर काँग्रेस भाजप आणि काँग्रेसनंतर  लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो.