व्हायचे होते साधू, झाले मंत्री ; ‘ओडिशाचे मोदी’ बनले राज्यमंत्री

शपथ घेण्यासाठी नाव पुकारताच टाळ्यांचा कडकडाट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपती भवनात काल झालेल्या शपथविधी समारंभात नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. या ५८ मंत्र्यांमध्ये ५६ व्या क्रमांकावर येऊन शपथ घेतलेल्या प्रतापचंद्र सारंगी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विखुरलेले केस आणि दाढी अशा रुपात ६५ वर्षीय सारंगी यांचे मंत्री पदाची शपथ घेण्यासाठी व्यासपीठावर आगमन होताच समोर बसलेल्या जन समुदायाने टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

ओडिशा सारख्या तुलनेने मागास राज्यातील बालासोर मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार झालेले प्रतापचंद्र सारंगी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. सारंगी पहिल्यांदाच खासदार झाले आणि मंत्रीही झाले. सारंगी लोकसभेवर निवडून आल्यावर त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यातून त्यांचे साधे राहणीमान दिसून येत होते. एका ट्विटर युजरने सारंगी यांचे फोटो शेअर करून त्यांचा उल्लेख ‘ओडिशाचे मोदी’ असा केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर सारंगी हे ओडीशाचे मोदी म्हणूनच ओळखले जाऊ लागले. काल झालेल्या शपथविधी समारंभात त्यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे सारंगी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

कोण आहेत सारंगी
गरीब कुटुंबातून येणाऱ्या सारंगी यांचा जन्म निलगिरी येथील गोपीनाथपूर गावात झाला. ४ जानेवारी १९५५ रोजी जन्मलेल्या सारंगी यांनी निलगिरी येथीलच फकीर मोहन महाविद्यालयातून पदवी घेतली. रामकृष्ण मठामध्ये साधू बनण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, त्यांची आई विधवा असल्याचं समजल्यानंतर घरी जाऊन आईची सेवा कर असा सल्ला त्यांना तेथील लोकांकडून देण्यात आला. त्यानंतर सारंगी आपल्या गावी परतले आणि समाजसेवा सुरू केली. सारंगी यांनी लग्न केलेलं नाहीये तसंच आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी जनसेवेसाठी अर्पण केलं आहे. ते एका छोट्याशा घरात राहतात आणि केवळ सायकलचा वापर करतात. त्यांच्या कुटुंबात केवळ आई होती, पण त्यांचंही गेल्या वर्षी निधन झालं.

सारंगी हे यापूर्वी २००४ आणि २००९ मध्ये ते निलगिरीतून आमदार झाले होते. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यंदा बिजू जनता दलाचे कोट्यधीश उमेदवार रवींद्रकुमार जेना यांचा पराभव करत सारंगी ओडिशातील बालासोरमधून निवडून आले. दांडग्या जनसंपर्काच्या बळावर सारंगींनी विजयाला गवसणी घातली.