भाजप नेते प्रताप सारंगींचा काँग्रेसवर ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘CAA म्हणजे देशाच्या विभाजनाच्या पापाचं प्रायश्चित’ (व्हिडीओ)

सुरत : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) या मुद्द्यांवरून देशातील वातावरण सध्या तापलेले आहे. अनेक ठिकाणी या कायद्यांविरोधात निदर्शने होत आहेत. सीएए कायद्याला देशातील सर्व विरोधी पक्षांनी नाराजी दर्शविली असून या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात येत आहेत. एकीकडे विरोधी पक्ष या कायद्याविरोधात निदर्शने करत आहेत तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष भाजपाकडून या कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. या दरम्यान आता केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते प्रताप सारंगी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

शनिवारी (१८ जानेवारी) प्रताप सारंगी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले की, ज्या लोकांना भारताची अखंडता आणि वंदे मातरम मान्य नाही, त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही. तसेच ते म्हणाले की देशाच्या विभाजनाच्या पापाचं प्रायश्चित्त म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा होय. ते गुजरातमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांनी हा टोला विरोधकांना लगावला.

प्रताप सारंगी यांनी म्हटले की, ‘देशाच्या विभाजनाचं पाप तर काँग्रेसने केलं होतं मात्र त्याचं प्रायश्चित तर आम्ही करत आहे. त्यामुळेच यासाठी काँग्रेसने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचं स्वागत केलं पाहीजे.’ तसेच ते म्हणाले की या कायद्याला विरोध का केला जात आहे? कारण त्यांचं अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती विरोधकांना आहे. त्यामुळेच देशात हा आग लावण्याचा प्रकार होत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच सारंगी कलम ३७० बद्दल म्हटले होते की ‘कलम ३७० हटवण्याचा निर्णय हा ७२ वर्षांपूर्वीच घेतला गेला पाहिजे होता. हे मोदी सरकारच आहे ज्याने ७२ वर्षांनंतर काश्मीरमधील नागरिकांना सर्व अधिकार दिले आहेत. तसेच जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती पूर्णपणे शांत आहे’ असा दावा देखील त्यांनी केला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like